
कर्जत ग्रामीण ( मोतीराम पादीर ) :
२५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेर जंगल सत्याग्रहात इंग्रजांविरुद्ध लढा देऊन आपल्या १३ साथीदारांसह प्राणांची आहुती देणारे थोर आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या बलिदान दिनानिमित्त कशेळे येथील आदिवासी संघटनेच्या कार्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला आदिवासी ठाकूर समाज संघटनांचे अध्यक्ष परशुराम दरवडा, सचिव भगवान भगत, काशीनाथ पादीर, उपाध्यक्ष मंगळ केवारी, दत्तात्रय केवारी, दिनेश पिंगळा, तसेच संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या लढ्यात आदिवासी समाजाचे मोठे योगदान होते. जंगलात राहणाऱ्या आदिवासींनी १८५७ च्या उठावापासून ते स्वातंत्र्याच्या लढाईपर्यंत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन जुलमी इंग्रज सत्तेविरुद्ध लढा दिला. या संघर्षांत हुतात्मा नाग्या कातकरी यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे होते.
चिरनेर जंगल सत्याग्रह आणि नाग्या कातकरी यांचा लढा:
१९३० च्या दरम्यान इंग्रज सरकारने आदिवासींचे जंगलावरील हक्क नाकारले होते. आदिवासींना जंगलातून लाकूड, गवत, फळे आणि वनौषधी गोळा करण्यावर बंदी घालण्यात आली. गाई-म्हशींना जंगलात सोडण्यासही मज्जाव करण्यात आला. या अन्यायाविरुद्ध देशभरात आंदोलनं झाली. त्यातीलच एक महत्त्वाचे आंदोलन होते चिरनेर गावातील सत्याग्रह.
नाग्या कातकरी आणि त्याच्या कातकरी समाजाने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. आपल्या टोळीला संघटित करून नाग्याने जंगल सत्याग्रहात उडी घेतली. पाच हजारांहून अधिक आदिवासी या सत्याग्रहात सामील झाले. जंगलावर असलेल्या प्रेमामुळे त्यांना सत्याग्रहात उतरण्याची प्रेरणा मिळाली. नाग्याने जंगलातील एका उंच झाडावर झेंडा फडकवला आणि सत्याग्रहाला नेतृत्व दिले.
या सत्याग्रहात इंग्रज पोलिसांनी अक्काबाईच्या जंगलात गोळीबार केला, ज्यात नाग्या कातकरी गंभीर जखमी झाला. त्याच्या मांडीत गोळी लागली आणि त्याला उपचार मिळण्याऐवजी घरगुती औषधांवर उपचार केले गेले. अखेर, २५ सप्टेंबर १९३० रोजी नाग्या कातकरीने आपल्या तरुण वयात प्राणांची आहुती दिली आणि तो हुतात्मा झाला.
आदिवासी समाजाने त्याच्या बलिदानाची आठवण ठेवून त्यांच्या त्यागाला वंदन केले. नाग्या कातकरी यांच्या बलिदान दिनानिमित्त आजही त्यांच्या धैर्याला आणि लढ्याला आदराने अभिवादन केले जाते.