महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कर्जत विधानसभा मतदरसंघाचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना मतदारांनी कौल दिला आहे. हाय व्होल्टेज असलेल्या या मतदारसंघात निकालावेळी काटे की टक्कर पाहायला मिळाली असली तरी मतदारांनी महेंद्र थोरवे यांना कौल दिला आहे. महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी ५ हजार ७६१ मतांनी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा पराभव केला आहे. दरम्यान अपक्ष असताना देखील सुधाकर घारे यांनी अखेरपर्यंत कडवी झुंज दिली असल्याचे चित्र आहे.
संवेदनशील असलेल्या १८९ कर्जत विधानसभा मतदारसघांकडे यंदा सर्वांचे लक्ष लागले होते. आमदार असलेले महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे हे विकासचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे गेले. तर विकासाचे व्हिजन घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत हे ही निवडणूक लढवत होते. यासह जन सामान्यांचा मोठा पाठिंबा असलेले सुधाकर घारे हे अपक्ष या निवडणुकीला सामोरे गेले. दिनांक २० रोजी मतदारांनी मतदानाला उत्तम प्रतिसाद देत मतदानाचा टक्का वाढवला होता. हा टक्का कुणाला तारणार अशी चर्चा केली जात होती. आज दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी कर्जत प्रशासकीय भवन येथे मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.
सकाळी ८ वाजता पोस्टल मतमोजणीला झालेली सुरुवात ही पुढील २६ फेऱ्यांपर्यंत उमेदवारांची धाकधूक वाढवणारी ठरली. सुरुवातीपासून महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे व अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यात असलेली लढत मतपेटीतून देखील दिसून आली. तर महविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत हे सुरुवातीपासून तिसऱ्या क्रमांकावर राहिले असल्याचे चित्र होते. कधी घारे यांनी घेतलेली आघाडी थोरवे मोडीत काढत होते. तर कधी थोरवे यांची आघाडी घारे उधळवून लावत होते. अखेरीस खालापूर तालुक्यातील बुथवरील मत मोजनीला सुरुवात झाली आणि अखेरच्या ८ फेऱ्यांमध्ये महेंद्र थोरवे यांनी घेतलेली आघाडी अबाधित ठेवत सुमारे 5761 मतांनी विजय संपादित केला.
कर्जत प्रशासकीय भवन येथे मतमोजणी करण्यात आली. १४ टेबलवर २६ फेऱ्यात ही मतमोजणीसाठी प्रक्रिया पार पडली. यासाठी २३ मतमोजणी पर्यवेक्षक, २९ मतमोजणी सहाय्यक, २३ मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक , २१ इतर पथकातील अधिकारी, वर्ग ३ चे १०६ इतर पथकातील अधिकारी ११९ चतुर्थ श्रेणी कर्मचारी 119 तर मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले होते. मतमोजणी निरीक्षक म्हणून जगदीप धंदा यांची नियुक्ती करण्यात आली होती. यासह कर्जत विधानसभा मतदारसंघ संवेदनशील असल्याने मतमोजणी केंद्र परिसर व शहर आदी भागात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी २ उपविभागीय पोलिस अधिकारी, ४ पोलीस निरीक्षक, 20 अधिकारी, 200 कर्मचारी व बिएसएफ प्लाटून तैनात करण्यात आले होते.