
सोगाव (अब्दुल सोगावकर ) :
अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथे लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चोंढी-किहीम तर्फे मुंबई विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना या माध्यमातून ‘स्वच्छता हि सेवा २०२४’ अंतर्गत महाविद्यालयाच्या ७० पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी प्राध्यापक व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवित संपूर्ण बहिरोळे गांव प्लास्टिक व इतर कचरा मुक्त केले.
या स्वच्छता अभियानाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षक यांनी मार्गदर्शन केले, तसेच यावेळी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संचालक व माजी शिक्षक गुरुवर्य चांदोरकर सर यांनी स्वच्छता अभियान राबवित असल्याबद्दल विद्यार्थी, प्राध्यापक व सर्व शिक्षकांचे कौतुक करत व आभार मानले. दरम्यान बहिरोळे येथील हनुमान मंदिर येथून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी बहिरोळे गावातील ब्राम्हण आळी, कुंभार आळी, घरत आळी, व इतर आळी मधील प्लास्टिक व इतर कचरा मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात येऊन ग्रामस्थांना स्वच्छतेचा मोलाचा संदेश दिला. जमा झालेला सर्व कचरा मापगाव ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीतून विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जाण्यात आले. या स्वच्छता अभियानात सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घरत यांनी अल्पोपहार दिला.
अभियानाच्या शेवटी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कायम सदस्य तसेच सुमती प्रगती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनिल थळे यांनी स्वच्छता अभियान राबवित आपला गाव आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व लक्षात आणून दिले, तसेच स्वच्छता याविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आल्याबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले.
यावेळी स्वच्छता अभियान राबवित असताना सहकार्य करण्यासाठी युवा नेता सूचित थळे, सुमती प्रगती शिक्षण मंडळाचे संचालक राजेंद्र घरत, श्रीकांत घरत, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान मोरे, संदीप थळे, संकेत कवळे, दिपेश माने, चेतन पाटील, स्वप्निल मोरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.