PEN न्यूज ऑनलाइन टीम :
डॉक्टर होण्याचं स्वप्न अनेक तरुणांचं असतं. यासाठी ते जीवतोड मेहनत करत असतात. पण जर हेच स्वप्न देशसेवेच्या मार्गाने पूर्ण करायचं असेल, तर सैन्यात डॉक्टर होण्यासारखा उत्तम पर्याय नाही. भारतीय सैन्यात डॉक्टर होणं म्हणजे केवळ एक नोकरी नाही, तर ती एक प्रतिष्ठेची आणि कर्तव्याची भूमिका आहे.
भारतीय सैन्यातील डॉक्टरांची रँक ही इतर आर्मी ऑफिसर्सप्रमाणेच असते. त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन, ग्रॅच्युटी, फॅमिली पेन्शन, मोफत वैद्यकीय सुविधा, रेशनसारखे फायदे मिळतात. यासोबतच देशसेवेची संधी आणि सुरक्षित भविष्यासाठी ही एक उत्तम वाट आहे.
AFMC मधून डॉक्टर बनण्याचा मार्ग:
सैन्यात डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला १२ वी नंतर NEET परीक्षा देऊन मेडिकल अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा लागतो. या परीक्षेतील गुणांच्या आधारे आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज (AFMC), पुणे येथे प्रवेश मिळतो. AFMC ही देशातील एक नावाजलेली संस्था असून तिचे संचालन थेट भारतीय लष्कर करतं.
AFMC मध्ये दरवर्षी १५० विद्यार्थ्यांना MBBS अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. त्यापैकी ११५ जागा मुलांसाठी, ३० मुलींसाठी आणि ५ जागा विदेशी विद्यार्थ्यांसाठी असतात. NEET मध्ये ६०० पेक्षा अधिक गुण मिळाल्यास AFMC प्रवेशासाठी चांगली संधी मिळू शकते.
प्रवेशासाठी NEET परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवारांना मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीही पार करावी लागते.
शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि परमनंट कमिशन:
सैन्यात डॉक्टर होण्यासाठी दोन प्रकारचे आयोग आहेत – शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) आणि परमनंट कमिशन (PC). जे विद्यार्थी आधीच MBBS किंवा BDS पदवीधर आहेत, ते SSC द्वारे भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर १२ वी नंतर NEET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी PC हा मार्ग खुला असतो. AFMC मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची थेट लष्कर, नौदल किंवा वायूदलात नियुक्ती होते.
AFMC मधून डॉक्टर बनण्याचे फायदे:
-
मोफत वैद्यकीय शिक्षण
-
सैन्यात अधिकारी होण्याची संधी
-
चांगला पगार आणि निवृत्तीनंतर पेन्शन
-
समाजात मान-सन्मान
-
देशसेवेचा अभिमान