चिमुकल्या लहान विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा देऊन त्यांच्या बालमनावर परिणाम करणार्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदवी सेनेने सोमवारी केली. यावेळी निलेश पाटील यांनी शाळा प्रशासनाना जाब विचारत त्वरीत कारवाई करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अन्याथा तीव्र आंदोलन करु असा इशारा दिला.
नवीन पनवेल सेक्टर 8 मधील सेंट विलफर्ड किड्स स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात शिकणार्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकांनी त्यांना अंधार्या खोलीत डांबून ठेवल्याची तक्रार पालकांनी हिंदवी सेनेला केली होती. या पार्श्वभुमीवर हिंदवी सेनेचे निलेश पाटील यांच्यासह सदस्यांनी शाळेला भेट देऊन याचा जाब विचारला तसेच निवेदन देऊन अशी शिक्षा देणार्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या विद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये इंग्रजी माध्यमातून पूर्व प्राथमिक विभागाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी देखील शिक्षण घेतात. पालक आपल्या शाळेत मोठ्या आशेने आणि विश्वासाने शिक्षणासाठी पाठवत असतात. मात्र हिंदवी सेनेकडे संघटनेकडे गंभीर स्वरूपातील तक्रारी येवू लागल्या आहेत. पूर्व प्राथमिक विभागाच्या पाल्यांना अभ्यास न केल्यामुळे त्यांना एका गडद काळोख असलेल्या अंधार्या खोलीत काही वेळ डांबून ठेवले जात असल्याची तक्रार पालकांनी आमच्याकडे केली आहे. ही शिक्षा जर खरी असेल तर ती बालमनावर परिणाम करणारी आहे. त्यामुळे पाल्यांच्या मनावर दहशत निर्माण होवून ते भविष्यात आपला आत्मविश्वास हरवून टाकतील. ती मुले कायम दहशतीच्या राहून त्यांच्या बुद्दी चातुर्यावर देखील परिणाम होवू शकतो. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची भावना आहे. अशी शिक्षा करणार्या शिक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदवातून करण्यात आली आहे.