
माथेरान ( मुकुंद रांजाणे ) : माथेरानचे भूमिपुत्र भारतीय जवान सुभेदार कै.विनय रमेश धनावडे यांच्या देशसेवेची महती भावी पिढीला ज्ञात असावी याच उद्देशाने येथील सामाजीक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी विनय धनावडे यांचे शिल्प उभारण्यात यावे यासाठी नगरपरिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे मागणी केल्यानुसार सुरेखा भणगे यांनी नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारात सन २०२२ मध्ये सुभेदार कै.विनय रमेश धनावडे यांचे आकर्षक शिल्प फायबर मध्ये उभारले होते.
परंतु एका वर्षांत ह्या शिल्पाची दुरवस्था झाली असून त्यावरील नावे गळून पडली आहेत तसेच सुभेदार कै. विनय धनावडे यांच्या डोक्यावरील भाग तुटलेल्या अवस्थेत असल्याने हे आकर्षक शिल्प विद्रुप दिसत आहे यासाठी विशिष्ट धातुमध्ये हे शिल्प पुन्हा एकदा उभारण्यात यावे अशी मागणी विनय यांच्या पत्नी सारिका विनय धनावडे आणि बंधू नरेंद्र धनावडे यांनी माथेरान नगरपरिषद, जिल्हाधिकारी रायगड, प्रांत कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कार्याचा मागोवा –
कै.विनय रमेश धनावडे यांचा जन्म ४ डिसेंबर १९६८ ,मृत्यू २४ जानेवारी २०२२,
शालेय शिक्षण सरस्वती विद्या मंदिर माथेरान येथे तर उच्च शिक्षण अभिनव शिक्षण संस्था कर्जत,
महाड येथे भारतीय जवानांच्या कॅम्पस थल सेनेमध्ये सामील,
भोपाळ येथे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर भारतीय थलसेनेच्या सुभेदार पदावर नियुक्ती,
१९९९ मध्ये कारगील युद्धात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला,
२००५ मध्ये बडोदा गुजरात येथे कार्यरत,
२००९ मध्ये जम्मू येथे सेवेत कार्यरत,
२०१३ ते २०१६ या कालावधीत अमृतसर पंजाब येथे कर्तव्यावर रुजू,
३१ ऑगस्ट २०१६ रोजी सिकंदराबाद याठिकाणी सेवानिवृत्ती.