सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्यावर शोकाकुळ वातावरणात डोलवी येथे अंत्यसंस्कार

Purushottam Maharaj
कोलाड (श्याम लोखंडे ) :
रायगड मधील प्रख्यात किर्तनकार पुरूषोत्तम उर्फ (बापू) पाटील महाराज (डोलविकर) यांचे आज पहाटे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी धाटाव येथील राहत्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेउन जगाचा निरोप घेतला. पाटील महाराजांच्या अचानक धक्कादायक निधनाने वारकरी सांप्रदायावर मोठा आघात झाला असून सबंध रायगड मधील वारकरी वर्गासह धाटाववासियांनी अक्षरशः हंबरडा फोडला.रोह्यात बालसई येथील अखंड हरिनाम सप्ताहा दरम्यानचे त्यांचे शेवटचे कीर्तन ठरले.त्यांच्या निधनाने सबंध रायगड जिल्ह्यातील वारकरी साप्रदयावर शोककळा पसरली आहे.
कोण होते बापू पाटील महाराज?
पुरूषोत्तम पाटील महाराज यांचा जन्म १ ऑगस्ट १९५३ रोजी वडखळ जवळ डोलवी (पेण) येथे झाला.कामानिमित्त धाटाव येथे आले असता त्यांनी सुदर्शन केमिकल लिमिटेड या कारखान्यात अनेक वर्षे सेवा केली.गुरुवर्य नामदेव बाबा डोलविकर यांचा हरिभक्त पारायनाचा वारसा जपत त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी प्रबोधनाला त्यांनी सुरुवात केली.सुदर्शन कंपनीत काम करीत असताना आपल्या अनोख्या कीर्तन शैलीने त्यांनी राज्यातील जनतेवर,अनुयायांवर गारुड केलं.त्यांना आवडीने बापू या नावानेच संबोधले जात होते.कीर्तन,भारूडे,गवळणी व रामायण कथा यासह ज्ञानेश्वरी ग्रंथाचा त्यांचा गाढा अभ्यास होता.
कीर्तनाच्या खास शैलीतून प्रबोधन
अलिबागकर महाराज,धोंडू महाराज कोलाडकर,गोपाळ वाजे महाराज यांच्या मार्गर्शनाखाली संत साहित्याबरोबरच,छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज,यांच्यासंदर्भातही ते आपल्या कीर्तनातून भाष्य करत.समाज प्रभोधन हा विषय ते आपल्या कीर्तनात प्रामुख्याने घेत.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाटील महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी भक्त जमत होते.धाटावमधे गुरुौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार होता.गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार,वर्धापनदिन त्याचप्रमाणे पंचक्रोषितील अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन,संयोजन त्यांच्याच नेतृत्वाखाली केले जात असत.गावातील ज्येष्ठ नागरिक,ग्रामस्थ,महिला,तरुण वर्गाला ते विशेष मार्गदर्शन करीत असत आळंदी येथे कोकण दिंडीच्या माध्यमातून वारकरी वर्गासाठी धर्मशाळा बांधण्याची त्यांची संकल्पना होती त्यांच्याच मार्गर्शनाखाली उभारलेली ही वास्तू पूर्णत्वास येत आहे.त्यांच्या कीर्तनाची खास शैली ही त्यांची खासियत होती.त्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या रायगड भूषण पुरस्कारासह इतर संस्थांच्या माध्यमातून धार्मिक कार्य आणि प्रबोधन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
शेवट तो भला माझा बहु गोड झाला
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात धाटाव येथे सप्ताहनिमित्त हरिभक्त परायण पुरूषोत्तम पाटील यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.तेव्हा ते म्हणाले होते,की मला कीर्तन करताना मरण आले,तर माझ्या सारखा भाग्यवान मीच असेल.मात्र काल बालसई हरिनाम सप्ताहात कीर्तनरुपी सेवा झाल्यानंतर रात्री महाराजांना धाटाव येथील निवासस्थानी पहाटे हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटना आमच्या सहवासात घडल्याने आम्ही साक्षीदार आहोत.हा विलक्षण योगायोग महाराजांच्या जीवनात आला असे हभप चंद्रकांत बाईत आणि रविंद्र महाराज मरवडे यांनी सांगितले. शेवटी हेच म्हणावे लागेल,की ‘शेवट तो भला माझा बहू गोड झाला.’
आज दुपारी ३:३० दरम्यान त्यांचे पार्थिव देह त्यांच्या मूळ गावी डोलवी येथे आणण्यात आले. त्यानंतर डोलवी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.    
याप्रसंगी पेण, वडखळ,रोहा,सुधागड,खालापूर,कर्जत या विविध विभागातून वारकरी सांप्रदायाचे प्रतिष्ठित मान्यवर,सामाजिक शैक्षणिक, कला,क्रीडा,राजकीय क्षेत्रासह त्यांच्या नातेवाईकांनी,लगतच्या पंचक्रोशीतील नागरिक,ग्रामस्थानी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.वारकरी सांप्रदायाच्या आमचा आधारवड हरपला अशा शोक अनेक वारकरी वर्गाने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading