साबळे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक हरीश्चंद्र कांबळे यांचे निधन

Kambale Sir
माणगांव  ( राम भोस्तेकर ) : 
पुर्वीच्या माणगाव इंग्लिश स्कूल आणि आताच्या अशोक दादा साबळे या शाळेतील विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती आणि त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी झटणारे सर्वांचेच लाडके मुख्याध्यापक हरीश्चंद्र सोपानराव कांबळे यांचे बुधवार दिनांक ४ डिसेंबर २४ रोजी अचानक ह्रदय विकाराच्या झटक्याने धक्कादायक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कांबळे सरांच्या निधनाच्या बातमीवर सुरवातीला कोणाचाही विश्वास बसतच नव्हता. मात्र सरांच्या निधनाची दुःखद बातमी दुर्दैवाने खरी ठरली.
सुरवातीला कांबळे सर शारीरिक शिक्षण आणि हिंदी शिकवत असत. त्यावेळी त्यांनी खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे अनेक विद्यार्थी विभागीय आणि राज्य स्तरावर चमकले होते. त्यासाठी ते रात्रंदिवस सराव घेत होते. हिंदी विषय शिकवताना संत कबीर यांचे दोहे मुखद्वत असत. हिंदी हा विषय अतिशय आवडीने शिकवत असत असे मुलं नेहमीच सांगत होते.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी खूप प्रयत्न केले. त्यासाठी लातूर पॅटर्न कसोशीने राबविण्यात यशस्वी झाले. त्यामुळे दहावीचा निकाल प्रथमच ९० टक्के लागला. त्यानंतर सातत्याने १०० टक्के निकाल लागत राहीला तो आजही कायम राहिला आहे. यांचे सारे श्रेय फक्त आणि फक्त कांबळे सरांना आहे. 
दररोज जादा क्लास घेणे, नववी आणि दहावी तसेच बारावीची लवकर परीक्षा घेऊन मार्च, एप्रिल आणि १ मे पर्यंत निम्मा अभ्यासक्रम पूर्ण करणे, विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आई, वडील, भाऊ, बहीण यांची विचारपूस आणि मार्गदर्शन करुन शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, पोर्शन पूर्ण झाल्यावर तीन सराव परीक्षा घेणे असे अनेक शैक्षणिक उपक्रम सरांनी प्रामाणिकपणे राबविण्यात आल्याने अशोक दादा साबळे विद्यालयाची गुणवत्ता उत्तरोत्तर वाढतच गेली. 
या कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेतील प्रवेश गुणवत्तेनुसार दिले जातात. हे या संस्थेचे मोठं यश म्हणता येईल. कांबळे सर निवृत्त होईपर्यंत ही शाळा उच्च यशो शिखरावर पोहोचली होती. ते यश आणि झालेली प्रगती आजही कायम टिकून राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या हाताखाली काम करीत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याला खुप उर्जा आणि उर्मी मिळत होती. असे शांत आणि संयमी, सुसंस्कृत, मनमिळावू व्यक्तीमत्व होते. ते विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध होते. 
इयत्ता दहावी मध्ये तृप्ती रामदास पुराणिक हि विद्यार्थीनी दहावीच्या शालांत परीक्षेत महाराष्ट्र राज्यात ९३ टक्के गुण मिळवून चौदाव्या क्रमांकाने आणि रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यांचे सारे श्रेय हरीश्चंद्र कांबळे सर यांना आहे. त्यावेळी राज्यात पहिली आलेली लातूरची मिनाक्षी कजबले आणि तृप्ती पुराणिक यांचा भव्य नागरी सत्कार आपल्या शाळेत ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्व शैक्षणिक उपक्रमात आमदार अशोक दादा साबळे, अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सेक्रेटरी कृष्णा भाई गांधी यांचे सहकार्य लाभले हे विशेष होय. या शाळेचा जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हरीश्चंद्र सोपानराव कांबळे यांनी दिलेल्या योगदानाची दखल सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल असा विश्र्वास प्रत्येक जण व्यक्त करीत होते. त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणात शिक्षक आणि नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading