उरण (विठ्ठल ममताबादे) :
दि. १४ एप्रिल २०२५ रोजी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, शेवा कोळीवाडा विस्थापित २५६ शेतकरी/बिगरशेतकरी कुटुंबांच्या वतीने उरण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. मागील ४० वर्षांपासून सुरू असलेल्या पुनर्वसनाच्या फसवणुकीविरोधात, तसेच बोगस ग्रामपंचायतीच्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
प्रमुख मागण्या:
-
बोगस ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडाची निवडणूक कायमस्वरूपी बंद करावी.
-
हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतमध्ये परगावच्या भूखंडांची व घरांची बेकायदेशीर नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी.
-
विस्थापितांच्या नावावर पाणीकनेक्शन न घेणाऱ्या व थकबाकी देयक न भरलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई.
-
जेएनपीटीने मंजूर केलेल्या १७ हेक्टर जमिनीतून १५ हेक्टर जमीन वन विभागास देण्यात आलेली असून, यामुळे पुनर्वसन न झाल्याची जबाबदारी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांवर निश्चित करून त्यांच्या विरोधात कारवाई करावी.
-
शेवा कोळीवाडा विस्थापितांचे प्रथम पुनर्वसन मंजूर असूनही, बोगस दस्तावेजांद्वारे हनुमान कोळीवाडा गावाची स्थापना करून दिशाभूल करण्यात आली आहे. या संदर्भातील सर्व दोषींवर IPC कलम १६७, ४६८, ४७१ इत्यादी अंतर्गत FIR दाखल करून CBI/CID चौकशी व्हावी.
-
FIR No. 14/2023, 03/2023, 226/2023, 09/2025 हे सामाजिक गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.
-
शेवा कोळीवाडा पुनर्वसनासाठी तयार झालेल्या जमिनीवर नागरी सुविधा त्वरित सुरू कराव्यात व भूखंडधारकांना ७/१२ उतारे देण्यात यावेत.
-
शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिराच्या पाणीपुरवठा, संरचनात्मक दोष, व इतर मूलभूत सुविधांवर तात्काळ उपाययोजना कराव्यात.
-
४० वर्षांत झालेल्या मानसिक व आर्थिक छळाचा रोखी मोबदला विस्थापितांना मिळावा.
-
चरितार्थासाठी पर्यायी रोजगाराच्या साधनांची तरतूद करण्यात यावी.