
संगमेश्वर ( संदीप गुडेकर) :
तालुक्यातील सुमारे 7 हजार अपंग, विधवा, निराधार, आणि श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी गेले दोन महिने बेकारीच्या संकटाचा सामना करत आहेत. शासनाकडून दर महिना त्यांच्या पोस्ट खात्यात 1500 रुपये जमा होतात, परंतु गेल्या महिन्यापासून आजतागायत या निधीची थेट खात्यात रक्कम जमा झालेली नाही. गणपती उत्सव संपला असून, अवघ्या 15 दिवसांवर दसरा आला आहे, तरीही अनेक लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शासनाच्या या योजनांमधून मिळणारे 1500 रुपये उदार निर्वाहासाठी मोठा आधार ठरतात. परंतु, केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी अद्यापही त्यांच्या खात्यांमध्ये जमा न झाल्यामुळे लाभार्थींच्या जीवनात मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. विशेषतः अपंग, विधवा आणि निराधार व्यक्तींनी या स्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
एकीकडे सर्व 288 आमदार, तसेच माजी आणि सध्याचे खासदार यांना लाखोंची पेन्शन नियमितपणे त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होत असताना, गरीब आणि असहाय्य लाभार्थ्यांसाठी शासनाच्या तिजोरीत पैसे का उपलब्ध नाहीत, असा सवाल लाभार्थी आणि सामान्य जनता विचारत आहे.
शासनाने या समस्या त्वरित सोडवाव्यात आणि गरजू लाभार्थ्यांना वेळेवर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.