श्रीवर्धन येथे रामदास गोविंद खैरे (वयस्कर इसम) यांची हत्या संपत्तीच्या लालसेतून झाल्याचे उघड झाले आहे. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची उकल करून ठाणे आणि चेंबूर येथून दोन आरोपींना अटक केली आहे.
प्राप्त माहिती नुसार रामदास खैरे हे श्रीवर्धनमधील कुंदन रेसिडेन्सी येथे एकटेच राहत होते. त्यांचा फोन बंद असल्यामुळे नातेवाईकांनी श्रीवर्धन पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक रिकामे यांनी त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता खैरे यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस तपासात असे समोर आले की, खैरे यांच्या पत्नीच्या निधनानंतर ते एकटे राहत होते. त्यांनी मित्राच्या मदतीने पुन्हा लग्न करण्याचा विचार केला होता. मात्र, संबंधित महिलेकडून घर आणि दागिन्यांची मागणी झाल्याने त्यांनी लग्नास नकार दिला. त्या महिलेने खैरे यांच्याशी जवळीक साधून, त्यांचा विश्वास जिंकून दागिने आणि पैसे घेतले. त्यानंतर खैरे यांनी वस्तू परत मागितल्यावर तिच्या पतीच्या मदतीने खूनाचा कट रचला. जेवणात किटकनाशक टाकून खैरे यांना बेशुद्ध करून, दोघांनी मिळून त्यांची हत्या केली. त्यानंतर मौल्यवान वस्तू लुटून पळ काढला. पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करून संशयितांना अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.