रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पालक वर्ग आपल्या मुलांचे उज्ज्वल भवितव्य लक्षात घेता त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देत आहेत. मात्र या शाळा केवळ शिक्षण देण्यापुरत्या न राहता, पालकांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या व्यावसायिक संस्थांमध्ये रूपांतरित झाल्या आहेत.
श्रीवर्धन शहरातील कोकण उन्नती इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल रोखून ठेवले आहेत. यामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराची चौकशी केली असता, शाळेच्या कमिटी सदस्य योगेश गंद्रे यांनी अरेरावीची भाषा वापरल्याने शहरात त्यांची चर्चा रंगली आहे.
शाळेकडून दरवर्षी अॅडमिशन फी, अॅक्टिव्हिटी फी, टर्म फी, ट्युशन फी अशा विविध प्रकारच्या शुल्कांची वसुली केली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याकडून हजारोंच्या घरात रक्कम घेतली जात असून, एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत हा आकडा लाखो रुपयांपर्यंत पोहोचतो. तरीसुद्धा फी थोडीशी उशिरा भरली गेली तरी विद्यार्थ्यांचे निकाल देण्यास टाळाटाळ केली जाते, हे शिक्षणाच्या पवित्र हेतूलाच हरताळ फासणारे आहे.
शाळा विना अनुदानित असल्याने ती स्वतःच्या आर्थिक स्रोतावर चालते, मात्र शासनाने अशा शाळांसाठी काही अटी व शर्ती घालून दिलेल्या आहेत. याचे पालन होणे अपेक्षित आहे. शासनाने ठरवलेल्या फी संरचनेचे पालन कोकण उन्नती इंग्लिश मीडियम स्कूल करत आहे का, याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे.
मे महिना सुरू असून शाळांचे निकाल जाहीर होत आहेत. जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असताना, शाळेकडून अशा अटी घालणे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम करणारे ठरू शकते. शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी, अशी पालकांकडून मागणी करण्यात येत आहे.
———————————
ज्यावेळी पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश घेतला होता तेव्हा त्यांनी फी चा विचार केला नव्हता का? शाळेची फी भरल्याशिवाय आम्ही निकाल देणार नाही कुठे जायचे तेथे जा तसेच शाळेला सेल्फ फायनान्सची परवानगी मिळाली आहे. विद्यार्थ्यांकडून मासिक वर्गणी जमा केली जाते. त्यातूनच शिक्षकांचा पगार दिला जातो. काही पालक फी वेळेत देत नसल्याने असे कठोर निर्णय घ्यावे लागतात.-
…योगेश गंद्रे. शाळा कमिटी मेंबर.कोकण उन्नती इंग्लिश मिडीयम स्कूल. श्रीवर्धन -रायगड.
———————————
संबंधित शाळेच्या प्रशासनास सूचना करून ज्याचे निकाल फी वाचून अडवले असतील त्यांचे निकाल देण्यास सांगतो.
…महारुद्र नाले.
———————————
फी भरली नाही म्हणून निकाल अडविणे ही बाब चुकीची आहे.सदर संस्थेच्या प्रशासनास सूचना देतो की सदर मुलाची फी बाकी असेल त्यांना त्याचे निकाल देण्यात यावे. तसेच त्याच्याकडे असणारी फी ही टप्प्या टप्प्याने वसून करण्यात यावी –
..चव्हाण. गट शिक्षण अधिकारी. श्रीवर्धन.
———————————
माझ्या पालकाची फी भरणे बाकी आहे. मात्र माझी आर्थिक अडचण असल्याने मी फी नंतर भरणार आहे अशी विनंती केली असताना सुद्धा संस्थेने माझी विनंती नाकारत त्यांनी निकाल देण्यास नकार दिला आहे. यापुढे मी निकाल घेण्यास शाळेत जाणार नाही.
…भावेश मांजरेकर. पालक.
———————————
या संदर्भात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मुश्ताक अंतुले यांच्याशी मोबाईल फोन वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मोबाइल फोन उचलला नाही.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.