लाडकी बहिण योजनेतील नोव्हेंबर हप्ता आम्ही यापूर्वीच बहिणींच्या खात्यात जमा केला. या योजनेत आपल्या सरकारने पाच हप्ते बहिणींना दिली. आम्ही हप्ते भरणारे आहोत तर आधीचे सरकार हप्ता वसुली करणारे होते, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. कुर्ला मतदारसंघाचे उमेदवार मंगेश कुडाळकर आणि अंधेरी पूर्व मतदार संघातील उमेदवार मुरजी पटेल यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री म्हणाले की काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक या राज्यामध्ये निवडणुकीत खोटी आश्वासने दिली आणि मते मिळवली. सत्ता आल्यावर काँग्रेसने लोकांची फसवणूक केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पैसे नाहीत सांगून हात वर केले. मात्र आम्ही शब्द पाळणारे आहोत. जे बोलतो ते करून दाखवतो. हे लोकांमध्ये जाऊन फेस टू फेस काम करणारे सरकार आहे फेसबुकवर लाईव्हवर काम करणारे नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला.
केंद्र आणि राज्य मिळून डबल इंजिन सरकार काम करत आहे. सरकारने लोक कल्याणच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. आम्ही देणारे आहोत. लाडक्या बहिणीच्या खात्यात नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबर मध्ये दिले. यामुळे विरोधकांची बोलती बंद झाली. आता मतदान झाले की लगेच डिसेंबरचे पैसे देणार असे त्यांनी सांगितले. लाडक्या बहिणीला केवळ १५०० रुपयांपर्यंत थांबवणार नाही तर त्यात आणखी वाढ करु असे शिंदे म्हणाले. विरोधक सत्तेत आल्यावर सगळ्या योजना बंद करू असे बोलतात तसेच ज्यांनी या योजना सुरू केल्या त्यांना जेलमध्ये टाकू, यावरही मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, लाडकी बहिण योजना सुरू करणे हा जर गुन्हा ठरणार असेल तर असे हजार गुन्हे करायला आपण तयार आहोत असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. सर्व जाती धर्मातील बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. विरोधक जेव्हा मत मागायला येतील तेव्हा बहिणींनी त्यांना कोर्टात विरोध कोणी केला असा जाब विचारायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. कोणीही आडवे आले तरी ही योजना बंद होणार नाही. बहिणींना सुरक्षित आणि लखपती बनवण्याचे आमचे स्वप्न आहे असे त्यांनी सांगितले.
मागील दोन वर्षात आम्ही लोकांना देण्याचे काम केले. मात्र २५ वर्ष ज्यांची मुंबईत सत्ता होती त्यांनी केवळ लुटण्याचे काम केले. रस्ते दुरुस्तीसाठी ३५०० कोटींचा भ्रष्टाचार केला. डांबरामध्ये पैसे खाल्ले अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. आम्ही मुंबईत रस्त्यांचे काँक्रिटीकारण केले. प्रदूषण कमी करण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह केले. यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून काम केले. दोन वर्षात वैद्यकीय सहायता निधीतून ३५० कोटींची मदत केली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील विमा कवच ५ लाखांपर्यंत वाढवले. लाडका भाऊ योजनेत वर्षभरात १० लाख युवकांना लाभ देणार असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
राज्यात मुलींना उच्च शिक्षण मोफत केले. ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली. शेतकऱ्यांना ७.५ एच.पी पंपाचे वीज बिल माफ केले. एस. टीमध्ये महिलांना ५० टक्के आणि ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलत लागू केली. सरकारने घरातील प्रत्येकासाठी योजना आणल्याचे ते म्हणाले. सरकार स्वतः ची घरे भरण्यासाठी नाही तर लोकांचे कल्याण करणारे हवे. मी मुख्यमंत्री नाही तर सामान्य माणूस म्हणून काम करतो असे ते म्हणाले.
आम्ही दोन वर्षात इतकं काम केले आहे की पाच वर्ष मिळाली तर किती करू याचाही मतदारांनी विचार करावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. मी एकदा शब्द दिला तर तो पूर्ण करण्यासाठी नंतर स्वतःचेही ऐकत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
मंगेश कुडाळकर कमी बोलता आणि जास्त काम करतात . मंगेश कुडाळकर आणि मुरजी पटेल यांना हरवणे अवघडच नाही तर अशक्य आहे असे सांगत शिंदे यांनी मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.