शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, बऱ्याचदा दर्शनासाठी येताना किंवा दर्शनानंतर परतताना काही दुर्घटना घडतात. या पार्श्वभूमीवर साई संस्थानने भाविकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. साईभक्तांना आता पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय संस्थानकडून घेण्यात आला आहे.
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, साईभक्तांनी दर्शनासाठी निघण्यापूर्वी साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन करेपर्यंत काही अप्रिय घटना घडल्यास संबंधित भक्ताला किंवा त्याच्या कुटुंबीयांना पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे.
साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, “जो भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहे, त्याच्यासाठी पाच लाखांचा विमा उतरवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र, त्यासाठी साई भक्तांनी दर्शनाला निघण्यापूर्वी संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे भक्त साईबाबांच्या दर्शनासाठीच येत आहे, याची खात्री होईल.”
साई संस्थानने सर्व साई भक्तांना आवाहन केले आहे की, “आपण निघण्यापूर्वी संस्थानच्या ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी अवश्य करावी आणि या विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा.”
दरम्यान, शिर्डीत गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्ष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून गुढी उभारली.
आज मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात पार पडले असून, साई भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. यानिमित्त साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रूपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठीची माळ परिधान करण्यात आली असून, संपूर्ण साई मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.