विहिरी व विंधनविहिरींमध्ये जलपुनर्भरण करण्याची नितांत गरज

Bhujal Sarvekshan With Palkar
पोलादपूर (शैलेश पालकर) :
तालुक्यात बोअरवेलचे प्रमाण गेल्या 12 वर्षांमध्ये सातत्याने वाढत असताना रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक भुजलाचे दुषित नमूने तालुक्यामध्ये आढळून आले आहेत. 14 वर्षांपूर्वी पुणे येथील रासायनिक पृथ:करण प्रयोगशाळेने ग्रामीण रूग्णालयाबाहेर केलेल्या उत्खननादरम्यान तालुक्यातील भुजलाचा अहवाल गोपनीय अहवाल सादर केला होता. मात्र, त्याकडे दूर्लक्ष करून पाणीटंचाई निवारणाच्या राजकीय प्रतिष्ठेपोटी बोअरवेलची संख्या वाढत गेली असल्याने ही दूषित पाणी नमून्यांची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत काही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भूगर्भातील पाणी उपसून झाल्यानंतर पुन्हा धरणीमातेचे पाण्याचे ॠण फेडण्यासाठी जलपुनर्भरण करण्याची निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची संकल्पना राबविण्याची नितांत गरज असल्याचे दिसून येत आहे.
 पोलादपूर तालुक्याच्या पाणीटंचाई उपाय योजना कृती आराखडयामध्ये पोलादपूर पंचायत समितीमार्फत 2010-11 मध्ये तीनवेळा बोअरवेल आराखडा प्रस्तावित करण्यात आला.  पहिल्या आराखडयात 1 जानेवारी ते 31 मार्च 2010 दरम्यान 15 गांवे आणि 61 वाडयांचा समावेश या बोअरवेल प्रोग्राममध्ये करण्यात आला. 1 एप्रिल ते 30 जून 2010 च्या बोअरवेल प्रोग्राममध्ये 8 गावांचा 13 वाडयांचा समावेश करण्यात आला. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2011 या कालावधीतील पाणीटंचाई निवारण कृती आराखडयामध्ये 42 गांवे आणि 172 वाडयांमध्ये अशा एकूण 214 ठिकाणी बोअरवेलची उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव करण्यात आला. याच पाणीटंचाई निवारण कृती आराखडयामध्ये 1 जानेवारी ते 31 मार्च 2012 मध्ये 4 गांवे आणि 22 वाडया अशा एकूण 26 ठिकाणी बोअरवेल खणण्याचा प्रस्ताव करण्यात आला.
या पाणीटंचाई निवारण कृती आराखडयामध्ये 31 डिसेंबरपर्यंतची बोअरवेलची प्रस्तावित मागणी आणि 31 मार्च 2012 पर्यंत बोअरवेलची प्रस्तावित मागणी पाहता आता प्रत्यक्ष आराखडयात तातडीने मंजूरी होऊ शकेल, अशी संख्या केवळ 26 बोअरवेलची असल्याने यामध्ये 40 बोअरवेलची विशेष अत्यावश्यक बाब म्हणून मागणी प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि जिल्हा पाणीटंचाई निवारण कृती समितीकडे सादर करण्यात आला. यामुळे तालुक्यात प्रचंड प्रमाणात भुजल उपशासाठी बोअरवेल करण्यात आल्याचे निष्पन्न होत असून पुणे येथील रासायनिक पृथ:करण प्रयोगशाळेच्या गोपनीय अहवालाकडे यामुळे दूर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याखेरिज,  नळपाणीपुरवठा योजनांच्या साठवण टाक्यांना झाकणे बसविली नसणे, पाणीपुरवठयाचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न नसणे, नळयोजनेच्या पाईपलाईनची गटार व अन्य भागातून जोडणी, गंजलेले पाईप अशा अनेक बाबी पेयजलाचे नमूने दूषित असण्यास कारणीभूत ठरले आहेत.
रायगड जिल्ह्यातील जिल्हा प्रयोगशाळा अलिबागकडून पोलादपूर तालुक्यातील ऑक्टोबर 2012 मध्ये पाठविण्यात आलेले 37 दूषित पाण्यांचे नमूने तपासून आले असता त्यापैकी 13 पाणी नमून्यांचा अहवाल पिण्यास योग्य असा प्राप्त झाल्याने नोव्हेंबर 2012 मध्ये पुन्हा त्याचठिकाणी दूषित पाण्याचे नमूने घेऊन जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, तालुक्यातील लोकवस्तीला पेयजलासाठी उपलब्ध सर्व स्त्रोतांचे नमूने एकाचवेळी संकलीत करून पाठविले गेले असता या पाण्याचा अहवाल पाहता कोणताही प्रदुषणकारी कारखाना नसूनही हे पाणी नैसर्गिकरित्या पिण्यास अयोग्य असल्याचा अभिप्राय आश्चर्यकारक असल्याचे दिसून येते.
ऑक्टोबर 2012 मध्ये आडावळे बुद्रकु बौध्दवाडी हातपंप, कापडे बुद्रुक भराववाडी हातपंप व भवानवाडी हातपंप, देवळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीत हळदुळे येथील बोअरवेल, देवळे येथील नळपाणी योजना, देवळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीत दाभिळ येथील नळयोजना, बोरावळे येथील गुडेकरकोंड येथील झऱ्याच्या पाण्याचा स्त्रोत, भोगावखुर्द येलंगेवाडीतील साठवण तलाव, कोतवाल खुर्द येथील सार्वजनिक नळ, देवपूर ग्रामपंचायत हद्दीतील गांजवणे येथील सार्वजनिक नळ, वझरवाडी येथील सुरबाचीवाडी साठवण टाकी, सडवली ग्रामपंचायत हद्दीतील चोळई नळपाणीपुरवठा योजना आणि चोळई येथीलच दुसरी नळपाणीपुरवठा योजनांचे पाणी दूषित असल्याचा अहवाल जिल्हा प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला असून दूषित पाण्याच्या नमून्यांचे प्रमाण 35 टक्के असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने केवळ दूषित पाण्यामुळे पसरणारे साथीचे आजार पोलादपूर तालुक्यात दिसून येत नसल्याचे समाधान न मानता फ्लोराईडस् व अन्य घातक क्षारयुक्त पाणी पिण्याने तालुक्यातील जनजीवनावर होणारे दूरगामी घातक दुष्परिणाम लक्षात घेण्याची गरज निर्माण झाली असून पहिले दूषित पाणी नमून्याचे प्रमाण कमी करण्यासाठी दुसऱ्यांदा पुन्हा नव्याने तेथील पाण्याचे नमूने पाठविण्याचा प्रकार ही वेगळीच अजब उपाययोजना असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.       
पोलादपूर तालुक्याच्या 2022 सालाच्या पाणीटंचाई निवारण आराखडयामध्ये भुजल उपसा करण्याकामी 13 गांवे आणि 55 वाडयांमध्ये अशा 68 ठिकाणी सुमारे 40 लाख 80 हजार रूपयांची विंधनविहिरी घेण्याची मागणी समाविष्ट करण्यात आली. आतापर्यंत विंधनविहिरी दुरूस्ती आणि विंधनविहिरी घेण्याच्या उपाययोजनांमुळे पोलादपूर तालुक्यात भुमातेला हजारो छिद्र पाडून दररोज लाखो लिटर्स पाण्याचा उपसा केला जात असून भुजलाचा पाण्याचा साठा मोठया प्रमाणात घटत आहे.
भूगर्भातील पाणी उपसून झाल्यानंतर पुन्हा धरणी मातेचे पाण्याचे ॠण फेडण्यासाठी जलपुनर्भरण करण्याची निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची संकल्पना ग्रामीण भागातही युध्दपातळीवर राबवली असून दरवर्षी पावसाळयामध्ये विंधनविहिरींमध्ये छपरावरून वाहून जाणारे पाणी पुन्हा भरल्यास बारमाही जलस्रोत खुला राहू शकतो. विहिरींच्या जलपुनर्भरणासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्याची जबाबदारीही लोकसहभागातून घेतल्यास अधिकाधिक बोअरवेलमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्रज्ञानाने जलपुनर्भरण करून भुजलाची पातळीही वाढविणे शक्य होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading