विकासाचा आलेख उंचावून पर्यटन क्रांतीसाठी माथेरानला अभ्यासू लोकप्रतिनिधी आणि सुज्ञ मतदारांची गरज !

Matheran Railway Station
माथेरान (मुकुंद रांजणे) : 
माथेरान हे जरी राज्यातील नावाजलेले रमणीय पर्यटनस्थळ असले तरी सुद्धा याठिकाणी अद्यापही अन्य स्थळांच्या तुलनेत विकासात्मक दृष्टीने आमूलाग्र बदल घडवून आणले गेले नाहीत. याला एकमेव कारण म्हणजे  राजकीय पक्षांची श्रेयवादी मंडळी जबाबदार आहेत. इथे एकाच विकासाच्या कामासाठी जणूकाही शर्यत पाहावयास मिळते.आपल्या माध्यमातून अमुक काम तडीस गेले पाहिजे आणि शक्यतो अन्य कुणाच्या प्रयत्न अथवा चिकाटीने महत्वपूर्ण कामे पूर्ण झाल्यास होत असणाऱ्या कामांत खोडा आणून काही अशिक्षित लोकांना पाठीशी घेऊन नेहमीप्रमाणेच राजकारण सुध्दा केले जाते. ही येथील एकमेव शोकांतिका म्हणावी लागेल.
जग एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना आजही इथे पूर्वापार चालत आलेल्या व्यवसायात स्वतःला गुरफटून घेतले जाते.विकासाच्या दृष्टीकोनातून नवनवीन प्रयोगांचा अंगीकार,स्वीकार करणे निदान भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी क्रमप्राप्त आहे. परंतु स्वतःची नैतिक जबाबदारी विसरून अनेकजण आधुनिक बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. ज्या काही राजकीय पक्षांच्या निस्वार्थी मंडळींना हे गाव खऱ्या अर्थाने विकसनशील करण्याची प्रांजळपणे इच्छा आहे. अशांना राजकीय क्षेत्रात, निवडणुकांत डावलले जाते,पराभूत केले जाते.आणि निवडणुकांत आर्थिक प्रलोभने उराशी बाळगून अकार्यक्षम उमेदवाराना सहकार्य केले जाते. त्यामुळेच हे सुंदर गाव आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे.
ज्यांना ज्यांना खरोखरच इथे पर्यटन क्रांती झाली पाहिजे, इथल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, स्थानिक तरुण काहिनाकाही व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकतो यासाठी आजवरच्या कार्यकाळात अनेक लोकप्रतिनिधी कमकुवत ठरले आहेत.राजकारण करू पाहणाऱ्या काहींना तर या गावाविषयी सहानुभूती दिसत नसून परिसरातून व्यावसायासाठी आलेले लोक काही वर्षांपूर्वी इथे ठाण मांडून बसले आहेत. अशांना गोंजारण्यात राजकारण्यांना धन्यता वाटत आहे. ज्यांचे इथे साधे मतदान सुध्दा नाही असे मतदार वेळप्रसंगी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी योजिलेल्या ओल्या सुक्या पार्ट्यांमध्ये हजेरी लावतात अशांवर विश्वास ठेवून इथले राजकारणीच प्रामुख्याने गावाला पिछाडीवर नेताना दिसत आहेत.
दस्तुरी या प्रवेशद्वारा पासून स्टोल्सचा कँसर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या छोट्याशा गावात हे विद्रुपीकरण सुरू आहे, त्यास आळा घालण्या ऐवजी अधिकारी वर्गावर दबावतंत्र आणून वाढत असलेल्या स्टॉलच्या कँसरला खतपाणी घालून स्थानिकांना मागे खेचण्यासाठी ही राजकीय मंडळी आघाडीवर दिसत आहेत. या गावाचे नेतृत्व करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर स्थानिकांना डावलून चालणार नाही. पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या स्थानिकांना रोजगाराच्या संधी,वाहतूक व्यवस्थेसाठी झटणाऱ्या, सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांची त्याचबरोबर या गावाच्या विकासाचा आलेख उंचावुन पर्यटन क्रांतीसाठी माथेरानला अभ्यासू लोकप्रतिनिधी आणि जनतेला वेळ देणाऱ्या नेतृत्वाची या गावाला गरज आहे.
राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नगरपालिकेत उच्च पदावर आरूढ होण्याची दिवास्वप्ने जरूर पहावीत, पक्षात राहून स्वतःच्या पारड्यात शासकीय निमशासकीय आर्थिक लाभ देणारी पदे मिळण्यासाठी नेहमीप्रमाणे आतापासूनच प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फक्त कामापूरता वापर करून न घेता त्यालाही त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक दृष्ट्या  विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सजग नेत्यांचीच गरज आहे. केवळ आर्थिक लोभापायी अकार्यक्षम उमेदवारांना निवडून देऊन स्वतासह गावाची हानी करणाऱ्या बहुतांश मतदारांनी निदान यापुढे तरी  विकासाला प्राधान्य देऊन कार्यक्षम उमेदवारांना आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून देण्यासाठी सुज्ञ मतदारांचीच गरज या गावाला अधिक भासते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading