वढाव गावात बहिरीदेवाच्या यात्रेला उत्साही प्रतिसाद; काटेरी पेरकुटे मारण्याची शंभर वर्षांची परंपरा आजही जपली

Vadhav Jatra
पेण : 
कोकणातील विविध देवस्थानांच्या यात्रांचा हंगाम सध्या जोमात सुरु असून, या निमित्ताने पारंपरिक चालीरीती आणि श्रद्धेचे अनोखे दर्शन घडते आहे. पेण तालुक्यातील प्रसिद्ध वढाव गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही बहिरीदेवाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली.
चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भरणाऱ्या या यात्रेत गावातील मध्यवर्ती बहिरीदेव मंदिरातून दुपारी बारा वाजता छबिना (पालखी) मोठ्या दिमाखात निघाला. या छबिन्यात शेकडो भक्त ढोल-ताशांच्या गजरात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे भक्तांनी अंगावर काटेरी पेरकुटे मारून घेत श्रद्धा प्रकट केली. या अनोख्या आणि तीव्र भक्तिभावाने ओथंबलेल्या परंपरेने उपस्थितांचे लक्ष वेधले.
छबिन्यासोबत गावातील महिला-पुरुष पारंपरिक गीते गात मोठ्या वढावहून दिव गावातील श्री नागेश्वर देवस्थानात गेले. तेथेही छबिन्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. नागेश्वर देवाचा छविनाही त्यानंतर काढण्यात आला. नंतर शिवनेरी मैदानात पोहोचताच देवकाठी उभारण्याच्या स्पर्धा रंगल्या. विविध उंच देवकाठ्यांची स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.
छबिन्याचा पुढील मार्ग राधाकृष्ण मंदिर, कांबळे आळी, तळेआळी, दत्तगुरू मंदिर असा ठरवून शेवटी बहिरीदेव मंदिरात परत झाला. यावेळी यात्रेला मोठा बाजारही भरला होता — खेळणी, मिठाई, सरबते, फळफुले, खाद्यपदार्थ यांची दुकाने आणि पाळणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.
बहिरीदेव हे जागृत देवस्थान मानले जाते आणि नवसाला पावणारा देव म्हणून त्यांची ख्याती आहे. मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणांहून हजारो भाविक या यात्रेसाठी उपस्थित राहतात. विशेष म्हणजे शंभर वर्षांपासून सुरू असलेल्या अंगावर काटेरी पेरकुटे मारण्याच्या परंपरेत यंदाही तरुणांसह जेष्ठ मंडळी मोठ्या श्रद्धेने सहभागी झाली.
गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या पवित्र प्रथेअंती कोणालाही इजा किंवा दुखापत होत नाही, कारण भक्तांचे रक्षण स्वतः बहिरीदेव करतो, अशी श्रद्धा ग्रामस्थांमध्ये आहे.
बहिरीदेवाच्या लेपाचा आणि कृपेचा अनुभव घेण्यासाठी यावर्षी यात्रेला अधिक गर्दी झाली होती. श्रद्धा, परंपरा आणि भक्ती यांचा संगम असलेली ही यात्रा खरोखरच अविस्मरणीय ठरली.
Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading