लोहारे येथील जनसंवाद दौऱ्यात अनंत गीते कडाडले

Anat Geete1

पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
महाराष्ट्रामध्ये 106 आमदार असल्याने सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजप आणि फडणवीसांनी अनेक वर्षे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मदतीने सत्ता मिळवली त्या शिवसेनेसमोर मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, अशी सत्तेची लालसा व्यक्त केली आणि पुन्हा सत्तेत येता आले नाही म्हणून शिवसेना फोडली सत्ता मिळवली. परंतू, ही सत्ता अल्पायुषी ठरेल अशी शंका वाटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. यामुळे केवळ सत्तालालसेपोटी महाराष्ट्रातील आणि देशातील पक्ष फोडून भाजपाने त्या पक्षांतील भ्रष्ट लोक घेऊन लोकसभेनंतरच्या सत्तेची गणितं जमविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत, या प्रयत्नांना बकासुरासारखे स्वरूप आले आहे. पक्ष फोडा आणि भाजप वाढवा, असे गलिच्छ राजकारण भाजप ज्या काँग्रेसने 70 वर्षांमध्ये काय केले असा प्रश्न विचारते, त्या काँग्रेसनेही कधी केले नाही. त्यामुळे या भाजप अन् फडणवीसरूपी बकासुराच्या वधासाठी भीमरूपी जनता सज्ज असल्याचा ठाम विश्वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंडिया आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला.
पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथे जनसंवाद दौऱ्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासमवेत व्यासपिठावर जिल्हा प्रमुख अनिल नवगणे,जिल्हासंपर्कप्रमुख संजय मानाजी कदम, जिल्हा उपसंघटक बाळ राऊळ, महाड विधानसभा मतदार संघाच्या संभाव्य उमेदवार स्नेहल जगताप-कामत, राजिमस बँकेचे संचालक हनुमंत जगताप, अमित मोरे, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार गटाचे कृष्णा करंजे, शेकापक्षाचे वैभव चांदे, काँग्रेसचे रघुनाथ वाडकर, संभाजी साळुंखे, सोमनाथ ओझर्डे, धनंजय देशमुख, स्वीटी गिरासे, जनार्दन मानकर तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
अनंत गीते यांनी पुढे बोलताना, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यात महिला आघाडीचा वाटा वाघिणीचा असावा अशी अपेक्षा व्यक्त करताना 52 टक्के महिला मतदार आहेत. महिला मशाली सारख्या धगधगत्या असल्या तर घरातील सर्वांचे मतदान मशालीच्या चिन्हावर होईल. दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्य इंडिया आघाडीच्या माध्यमातून घेऊन विजयी होणार असल्याचा दावा करीत मे महिन्यात बहुतेक चाकरमानी कोकणात गावाकडे असतात,  ही आपल्या विजयाची जमेची बाजू असेल, असे सांगितले. प्रतिसर््पध्यांना अशी प्रचारसभा धाडस नाही, असे सांगून अनंत गीते यांनी, रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीतेचा विजय मिडिया जाहीर करत आहे. पक्षप्रमुख उध्दवजींसह आणि इंडिया आघाडीने आपली उमेदवारी जाहीर केली आहे आणि गेल्या पाच महिन्यांपासून प्रचार सुरूच असल्याचे यावेळी अनंत गीते यांनी सांगितले. यावेळी भ्रष्टाचाराच्या पापाच्या आणि शापाच्या पैशाचा वापर मोठया प्रमाणात होणार आहे, त्यामुळे आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन करताना गाढवाची किंमत 60 हजार असताना मतदाराची किंमत 1 हजार ठरविणाऱ्यांना हाकलून लावण्याची मार्मिक कथाही अनंत गीते यांनी सांगितली.
महाड विधानसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवार स्नेहल जगताप-कामत यांनी, सगळयांनी निर्धार व्यक्त करायची गरज आहे. सदाचार विरुध्द भ्रष्टाचार अशी लढाई आहे. ती पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी फक्त जिंकण्यासाठी असल्याचे ठामपणे सांगितले आहे. गीते साहेबांना जराही भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही, आपले नेते उमेदवार निष्कलंक आहेत. खासदार म्हणून निश्चितच निवडून येणार आणि महिलांचा हातभार मोठा असेल. माझे हात बळकट करण्यासाठी गीते साहेब खासदार झाले पाहिजेत, असे यावेळी स्नेहल जगताप-कामत यांनी सांगितले.
प्रारंभी धनंजय देशमुख यांनी प्रास्ताविकामध्ये, महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशातील भाजपप्रणित एनडीएला निकाराचा प्रतिकार करून देशातील लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकावर कशी आली आहे. हे लोकसभेच्या प्रचारामार्फत जनतेला सांगावे लागणार असल्याचे सांगून लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना विजयी करण्यासाठीच मतदान करण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
यानंतर जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी, 62 जिल्हा परिषदेच्या व 6 विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभा होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर गीते साहेब पुन्हा पोलादपूर शहरात प्रचारासाठी येतील, अशी माहिती देत तटकरे यांनी अंतुले साहेब, विलासराव देशमुख साहेब आणि आता पवार साहेब यांच्यासह ज्यांना नेता बनवलं. त्यांच्यासोबत गद्दारी करून जेलमध्ये जाण्याचं टाळलं आहे. त्यांच्यासोबत सध्या गीते साहेबांच्यासोबत राहून परस्पर गीते साहेबांच्या विकासकामांची नारळ फोडून फित कापून क्रेडिट घेतलं ती मंडळीदेखील आहेत, अशी टीका केली.
शेतकरी कामगार पक्षाचे वैभव चांदे यांनी शेकापक्षाचे तरुण कार्यकर्ते तनमनधनाने सोबत असतील. गीतेसाहेबांनी साद दिल्यानंतर भगव्यासोबत लालबावटाही सळसळत विरोधकांना चारीमुंडया चित करेल, अशी ग्वाही दिली.
काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते रघुनाथ वाडकर यांनी, सहावेळा खासदार होऊन गीते साहेब आपल्यासमोर आहेत. हिंदवी स्वराज्याचा शिवसेनेचा जो झेंडा रोवला; त्यावेळी भाजपचे बाळ दत्तक घेतले आणि या दत्तक बाळाने शिवसेनेचा घात करण्यास सुरुवात केली. हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली म्हणणं पुर्णपणे चुकीचे आहे. इडीची काडी भ्रष्टाचाऱ्यांच्या मागे लागली आहे. जनतेला हे समजून आले आहे. आता मतदार जागेवर पण आमदार खासदारांच्या मागे कोणी नाही, अशी स्पष्टोक्ती केली.
लोहारेतील सभेमध्ये शिवसेना उमेदवार अनंत गीते यांना प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading