मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातून कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. मात्र,मुंबईकडून कोकणात जाण्यासाठी वाहतुकीस परवानगी असूनही कशेडी घाटात भुयाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले नसल्याने मुंबईकरांना आजदेखील कशेडी टॅपमार्गे खेडकडे रवाना व्हावे लागत असल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणूक काळामध्ये चाकरमान्यांसाठी भुयारी मार्गातून पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू होणार असून 1 मे पासून याबाबतची सूचना जाहिर होण्याची शक्यता आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग बांधण्यासाठी कातळी भोगावच्या हद्दीत दोन भुयाराचे काम वेगाने सुरू झाले. मात्र, एका भुयारातून वाहतुकीने वेग घेतल्यानंतर दुसऱ्या भुयाराचे काम प्रचंड मंद गतीने सुरू आहे. अशातच, दुसऱ्या भुयारातून मुंबईकडून कोकणात जाण्याचा तीनपदरी महामार्ग सुरू होणार असताना पोलादपूर हद्दीतील या भुयाराचे बूमरने खणण्याचे काम झाल्यानंतर त्यापुढील बाजूला तीनशे मीटर्स लांबीचे काँक्रीटचे नवीन भुयारसदृश्य अर्धगोलाकार स्ट्रक्चर बांधण्याचे काम सुरू आहे. हा प्रकार अनाकलनीय असून या भुयाराची लांबी नियोजित कामानुसार नसल्याने ही नौबत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.च्या एसडीपीएल या पोटठेकेदार कंपनीवर आली आहे काय, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी, जे भुयार बांधून पूर्ण झाले आहे; त्या भुयारामधून कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांचा प्रवास सुरू राहणार असताना प्रत्यक्षात सध्या तेथून मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. ही वाहतूक सुरू असताना मुंबईकडून पोलादपूरच्या कशेडी घाटात आलेल्या वाहनांना भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याची दिशा दाखविणारा फलक न लावल्याने असंख्य कोकणवासियांची वाहने सध्या कशेडी घाटातील कशेडी टॅप पोलीस चौकीसमोरील जुन्या महामार्गावरून मार्गस्थ होत असल्याचे दिसून येत आहे.
कशेडी घाटातील जुना मुंबई गोवा महामार्ग डांबरीकरणाचा असून अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनांचे टायर्स या खड्डयात आदळून अपघात होण्याची अथवा वाहने नादुरूस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कशेडी घाटातून मार्गस्थ होताना या वाहनांना अनेक तीव्र उतार तसेच अरूंद रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईहून पोलादपूरमार्गे आलेल्या वाहनांना कातळी भोगाव येथील भुयारी मार्गाकडे जाणारा रस्ता सापडला नाही तर थेट कशेडी घाटातून मार्गस्थ होताना संपूर्ण कशेडी घाटच पार करावा लागत असून यामुळे भुयारी मार्ग कशासाठी बांधण्यात आला आहे, असे प्रश्चचिन्ह उपस्थित होत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान करण्यासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना भुयारी मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे संकेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिले आहेत. त्यामुळे केवळ सणावारी आणि मतदानाच्या निमित्ताने या भुयारी मार्गातून दुहेरी वाहतूक करण्याची मुभा देऊन कोकणवासियांना प्रभावित करण्याचा केविलवाणा प्रयत्न महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून होत असल्याचे कोकणवासियांचे म्हणणे आहे. भुयारी मार्ग एकेरी वाहतुकीसाठी खुला असेल तेव्हा जुना महामार्ग खड्डे बुजवून आवश्यक तेथे साईडपट्टया भरून वाहतुकीस सक्षम करण्याचे प्रयत्न होत नसल्याबद्दल अनेक चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्यावर्षी गणेशोत्सवकाळात भुयारी मार्ग वाहतुकीस खुला करताना ‘वनवे’ असा दिशादर्शक फलक लावून मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना भुयाराकडे वळण्यासाठी प्रवृत्त करणारे बावटेधारी कर्मचारीदेखील कशेडी घाटाचा जुना रस्ता आणि भुयाराचा नवीन तीन पदरी मार्ग या दोहोंच्या मध्ये उभे करण्यात आले होते. अशी व्यवस्था याठिकाणी पुन्हा तैनात ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.