
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
गणपती बाप्पा मोरया’ च्या’ गजरात रायगड जिल्ह्यातील सर्वत्र सकाळपासून घरगुती व सार्वजनिक गणरायांचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले.
गेल्या दोन दिवसांपासून गणपतीसाठी सजावट करण्यात आबालवृद्ध मग्न होते. गणपती कारखान्यात सकाळपासून गणेशमूर्ती नेण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. कोणी चालत, कोणी मोटारसायकलने, कोणी एसटीने, तर कोणी स्वतःच्या वाहनातून गणेशमूर्ती नेत होते. बरेच लोक एकत्र येऊन ग्रुपने खासगी वाहन करून गणेशमूर्ती नेत होते. घरगुती गणपतींच्या आगमनाची तयारी गेल्या दोन दिवसापासून, तर गेले महिनाभार सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते मंडपाची तयारी करत होते. त्याला आज पूर्णत्व आले.
सार्वजनिक गणेश मंडळे ढोल, ताशा, बेंजो लावून ट्रॅक्टर व अन्य वाहनांवरून मिरवणुकीने गणेशमूर्ती आणून प्रतिष्ठापना केली. सार्वजनिक गणेश मंडळे अजूनही हलत्या देखाव्यासाठी कामात मग्न असल्याचे चित्र आहे. दुपारी एक ते सायंकाळी चारचा चांगला मुहूर्त असल्याने अनेक लोक ही वेळ साधण्यासाठी धडपड करताना दिसत होते.
ढोल-ताशा पथकांचा निनाद, बँड पथकाचे मधूर सूर, नगारावादनासह सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष, पारंपरिक पेहरावातील कार्यकर्त्यांचा उत्साह अशा उत्सवी वातावरणात शनिवारी वाजत- गाजत गणरायाचं स्वागत करण्यात आलं.
मानाच्या गणपती मंडळांच्या गणरायाची विधिवत मुहुर्तावर प्रतिष्ठापना करण्यात आली. रायगड जिल्ह्यात सर्व गणेश मंडळांनी तसेच घरघुती गणेश भक्तांनी पारंपरिक मार्गावर गणरायाच्या आगमनाची मिरवणूक काढली.
आनंदपर्वाची गणेश चतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना करून सुरुवात झाली. घरोघरी चैतन्यपूर्ण वातावरणात श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पूजा साहित्य खरेदीसाठी मंडई परिसरात गर्दी झाली होती. घरातील गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर कार्यकर्ते आणि ढोल-ताशा पथकातील वादक युवक-युवती पारंपरिक पेहराव परिधान करून मंडळांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
रायगड जिल्ह्यात पोलिस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या अठ्ठावीस पोलिस स्टेशन हद्दीत 273 खासगी तर 103024 खासगी गणरायाचे स्वागत करण्यात आले.