मुंबई (मिलिंद माने) :
राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील हप्ता १५०० वरून २१०० रुपये केला जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप निधी वाढवण्यात आला नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. विधानसभेत यासंदर्भात चर्चा झाली, ज्यामध्ये महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिलं.
लाडकी बहीण योजनेतून काही लाभार्थी महिलांना वगळण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना तटकरे म्हणाल्या, “नमो शेतकरी महिला योजनेत १००० रुपये मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून ५०० रुपये देण्यात येतात. त्यामुळे कोणीही वगळले गेलेले नाही.”
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाईंनी योजनेच्या लाभार्थींच्या संख्येवर प्रश्न उपस्थित केले. त्यावर आदिती तटकरे यांनी सांगितलं, “ऑक्टोबर २०२४ मध्ये २ कोटी ३३ लाख ६४ हजार महिलांना लाभ मिळत होता, तर फेब्रुवारी २०२५ मध्ये हा आकडा २ कोटी ४७ लाखांहून अधिक आहे.”
हप्ता २१०० रुपये कधी होणार, यावर तटकरे म्हणाल्या, “महिला लाभार्थींना १५०० रुपये मिळत राहणार आहेत. २१०० रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या स्तरावर घेतला जाईल. मात्र, लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही.”