PEN न्यूज ऑनलाइन टीम :
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी होणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. वार्षिक अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व चारचाकी वाहन मालक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी छाननीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, तक्रारींच्या आधारेच छाननी होईल. तसेच, त्यांच्या कार्यकाळात अशा तक्रारी आल्या नव्हत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, योजनेतील २ कोटी ३४ लाख लाभार्थ्यांपैकी १५ ते २० टक्के महिला अपात्र ठरू शकतात, अशी शक्यता आहे. म्हणजेच, सुमारे ३५ ते ५० लाख महिलांना योजनेच्या लाभावर पाणी सोडावे लागणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजना सुरू ठेवण्याचे व हप्ता वाढवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र निकषांचे उल्लंघन करणाऱ्या अर्जांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.