रोह्यात ६४ ग्रा.पं. सरपंचपदासाठी आरक्षण सोडत जाहीर, महिला आरक्षण पडल्यानं अनेकांच्या अपेक्षा भंग

रोह्यात ६४ ग्रा.पं. सरपंचपदासाठी आरक्षण सोडत जाहीर, महिला आरक्षण पडल्यानं अनेकांच्या अपेक्षा भंग
कोलाड (श्याम लोखंडे) : 
तालुक्यातील ६४ ग्रा.पं.च्या सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आणि महिलांसाठी पुढील पाच वर्षाकरीता (सन २०२५ ते २०३० या कालावधीत गठीत होणाऱ्या ग्रामपंचायती करीता) आरक्षित करुन सरपंच पदाची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने रोहे तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी मंगळवार ( दि.२२) रोजी जेष्ठ नागरिक सभागृहात सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम प्रभारी उपविभागीय अधिकारी सायली ठाकूर, तहसीलदार डॉ.किशोर देशमुख,उपविभागीय कार्यालय नायब तहसीलदार निलेश गवणकर, निवासी नायब तहसीलदार राजेश थोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी शिंदे गटाचे तालुका प्रमुख ऍड. मनोजकुमार शिंदे, रामचंद्र चितळकर, महेंद्र पोटफोडे, मनोज शिर्के, शिंदे सर, चंद्रकांत लोखंडे, मारुती देवरे,अंनत वाघ,अनिल तवटे, बाबुराव बामणे तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान या नवीन आरक्षणात सरपंचपदासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे स्वप्न भंग झाले. त्यामुळे कही ख़ुशी कही गम असे एकंदरीत वातावरण सभागृहात दिसून येत होते.
रोहे तालुक्यातील ६४ ग्रा.पं.चे सरपंच पदाचे आरक्षण घोषित करण्यात आले. यात अनु. जातीच्या महिलांसाठी असलेल्या ३ पैकी २ राखीव तर अनु.जाती खुला प्रवर्गसाठी १घोषित करण्यात आल्या.तसेच अनु.जमातीच्या आरक्षित असलेल्या एकूण १० जागांपैकी ५ ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित तर पाच ग्रामपंचायत्ती अनु.जमाती खुला प्रवर्गसाठी घोषित करण्यात आले. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण १७ ग्रा.पं.चे आरक्षण घोषित करण्यात आले. त्यापैकी ८ ग्रा. पं. महिलांसाठी राखीव तर ९ ग्रा.पं.ती खुला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. तसेच सर्वसाधारण एकूण ३४ जागापैकी १७ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून उर्वरित १७ जागा सर्वसाधारण खुलाप्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या.
या आरक्षण सोडतीत अनिसूचित जातीसाठी खुला वर्ग सानेगाव ग्रा. पं. तर अनु.जाती महिलांसाठी विरझोली, चणेरा असे आरक्षण घोषित करण्यात आले. अनुसूचित जमाती महिलांसाठी न्हावे, वणी, पाटणसई, खारगाव, कोलाड या ग्रामपंचायतीचे आरक्षण पडले आहे. तर अनु.जमातीच्या खुला प्रवर्गसाठी कोंडगाव, कडसुरे, ऐनवहाल, धामणसई, वांगणी असे आरक्षण घोषित करण्यात आले.
तसेच ना.मा.प्र (ओबीसी) महिलांकरीता भिसे, दापोली, वारसगांव, गोवे, देवकान्हे, तांबडी, जांमगाव, येरळ या ८ ग्रामपंचायत्ती घोषित करण्यात आल्या तर ना.म.प्र.खुला वर्गासाठी वाली, खांब, वरवठणे, मढाळी खुर्द, चिंचवली तर्फे दिवाळी, नेहरूनगर, पुई, पळस, भातसई या ग्रामपंचायतींचे वरिलप्रमाणे आरक्षण घोषित करण्यात आले.
धोंडखार तर्फे बिरवाडी, रोठ बुद्रुक, नागोठणे, खैरे खुर्द, वरसे, मेढा, शेणवई, आरे बुद्रुक, कुडली, धाटाव, तळवली तर्फे अष्टमी, महाळुंगे, पिंगळसई, तिसे, पुगांव, खांबेरे आणि चिंचवली तर्फे आतोणे या १७ ग्रामपंचातीचे आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले.
त्याचप्रमाणे मालसई, रोठ खुर्द, तळाघर, वावेपोटगे, निडी तर्फे अष्टमी, पिगोंडा, आंबेवाडी, किल्ला, सारसोली, शेडसई, भालगाव, घोसाळे, संभे, कोकबन, वाशी, पहूर व ऐनघर या १७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण वरिलप्रमाणे घोषित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading