रोह्यात सहा ठिकाणी घरफोडीनं खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Chor 12
कोलाड (श्याम लोखंडे) : 
रोहा तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी बंद घरे फोडून मोठी चोरी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (दि. २६ मार्च) रात्री अज्ञात चोरट्यांनी रोहा अष्टमी नाक्यावरील एका नवीन बिल्डिंगमधील तीन ब्लॉक, नेहरूनगर येथील एक ब्लॉक आणि वरसे ग्रामपंचायत हद्दीतील आदर्शनगर येथील चैतन्य अपार्टमेंटमधील दोन ब्लॉक अशा सहा ठिकाणी घरफोडी करून दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या.
चोरट्यांनी बंद घरे हेरून धारदार शस्त्राने कडी-कोयंडे तोडून प्रवेश मिळवला. विशेष म्हणजे, अष्टमी नाक्यावरील बिल्डिंगमध्ये चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी इतर ब्लॉकच्या बाहेरून कडी-कोयंडे लावून नागरिकांना बाहेर पडू न देता चोरी केली. चैतन्य अपार्टमेंटमधील राजेंद्र गुरव यांच्या घरातून सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची गणपती मूर्ती, चांदीची फ्रेम, चांदीचे कॉइन आणि १३ हजार रुपयांची रोकड चोरी झाली. तर त्यांच्या शेजारील समीक्षा सुरेश मांडवकर यांच्या घरातून सोन्याची गंठण, कानातील टॉप, नाकातील नथ आणि रोख रक्कम चोरीस गेली.
चोरीची माहिती मिळताच रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामे करून रात्रीभर सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू करण्यात आली. गुरुवारी सकाळी श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांनी तपास अधिक गतीमान केला. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.
एकाच वेळी सहा ठिकाणी झालेल्या चोरीमुळे रोह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून, ते कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading