रोह्यात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ओम चेंबर इमारतीत 52 वर्षीय उर्मिला सिद्धाराम कोरे या महिलेने आपल्या केवळ दोन वर्षांच्या नातवासह इमारतीच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
ही दुर्दैवी घटना बुधवारी (9 एप्रिल 2025 रोजी) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. उर्मिला कोरे यांनी त्यांचा नातू सोबत घेत गच्चीवर गेल्या आणि कोणताही विचार न करता खाली उडी घेतली. या उंचावरून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या नातवाचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. आजीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार, नातवाच्या गंभीर आजाराला कंटाळून उर्मिला यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या पोलीस कोरे कुटुंबीय, त्यांच्या ओळखीचे लोक आणि शेजाऱ्यांकडे चौकशी करत आहेत. तसेच आत्महत्येपूर्वी उर्मिला यांनी कोणतीही सुसाईड नोट लिहून ठेवली आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही.
या दुर्दैवी घटनेमुळे रोह्यात हळहळ व्यक्त केली जात असून, समाजात मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.