रोहा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेली श्री क्षेत्र तळाघर येथील स्वयंभू महादेवाची यात्रा रामनवमी उत्सव सोहळा १६ ते १७ एप्रिल रोजी साजरा होत आहे. या यात्रेत महादेवाचे लग्न आणि त्यानंतर छबिना हे प्रामुख्याने पारंपरिक विधिवत पध्दतीने कार्यक्रम होतात. या यात्रेमध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक आपपला व्यवसाय थाटतात. तर यात्रेतील वैशिष्टय म्हणजे देवाचा प्रसाद म्हणून चिंबोरीचे काळवण प्रसिद्ध आहे त्यामुळे सारे जण चिंबोऱ्या खरेदी करतात.
जिल्ह्यातील तळा, मुरूड, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा आदी तालुक्यासह विविध ठिकाणाहून तर विशेषतः ग्रामीण भागातून भाविक या ठिकाणी या शिवलिंगाचे दर्शनासाठी येत असतात. प्रसाद म्हणून दिले जाणारे चिबोरीचे काळवण हे या यात्रेचे वैशिष्टय मानले जाते. तर बहुसंख्येने कोळी बांधव यावेळी खाऱ्या पाण्यातील चिंबोरीचा व्यवसाय करतात. यासाठी मंगळवारपासूनच या ठिकाणी लहान मुलांची खेळणी व विविध प्रकारचे छोटे मोठे विविध प्रकाचे दुकानदार येऊन बसले आहेत.
या यात्रेत प्रामुख्याने संपन्न होत असलेले महादेवाच्या विवाहाचे सर्व धार्मिकविधी, मानपान बहुजन समाज द्वारे व त्यांच्या चालीरीतीप्रमाणे रामनवमीच्या दिवशी मोठे आगळे वेगळे स्वरूप म्हणजे यात जत्रेच्या विविध प्रकारे सजविलेल्या काठ्या हे या यात्रेचे आकर्षण असते. या यात्रेत येणारे यात्रेकरू कोळी बांधव आणि महादेववाडीच्या सुतारांची गळाभेट घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने यात्रेकरू आजही पायी दिंडी पदयात्रा करत येतात.
महादेवाचे लग्न विधी करण्यासाठी परिसरातील सात गावचे जंगम येतात. रात्री बारा वाजता खारगावचा नवरा आणि धाटावची नवरी असा हा आगळा वेगळा आणि महत्वपूर्ण विवाह सोहळा व लग्नाचा मुहर्त असतो. विधीसाठी लागणारी मातीची भांडी दमखाडीचे कुंभार देतात, तळा घरचे मोरे दीपमाळ लावतात. खारगांव येथून पालखी येते. बामुगडे घराणा मानाची निमंत्रणे द्यायला जातो. सोनगावचे ग्रामस्थ तेलवण, वरातीचे आमंत्रण देतात. धाटावहून काठी तेल वणाच्या दिवशी येते. पालखीला तारेगावचे भोई असतात. मग शिवपार्वतीची जत्तर काठीवर प्रतिष्ठापना होते. वारळची काठी मंदिरासमोर उखळात उभी करतात. सुतार भगत महादेवाची मूर्ती मांडीवर घेऊन विवाहास बसतात. शेजारी धाटावचे रटाटे असतात. किल्ल्याची करवली, तळाघरचा करवला उभा असतो.
यावेळी स्थानिक पोलीस पाटलांना विशेष मान असतो. मंगलाष्टका धाटाव, लांढर, भुवेनश्वर, देवकान्हेचे जंगम म्हणतात. असा हा सोहळा दोन दिवस रंगतो. या सर्व प्रथा-परंपरा पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे भाविकांची प्रचंड गर्दी या यात्रेत पहावायास मिळतात व दर्शन घेत यात्रेचा आनंद घेता येतो तसेच ही यात्रा यशस्वी करण्यासाठी धाटाव पंचक्रोशीतील सर्व सरपंच, सदस्य, तळाघर ग्रामस्थ, पंचक्रोशी, यात्रा समिती सहभगी होत परिश्रम घेतात.
यात्रेला ऐतिहासिक वारसा
सोमवार पासुन धार्मिक पूजेला सुरूवात करण्यात आली असून हळद मोहा असे कार्यक्रम पार पडले.तर आज मंगळवार रात्रौ बारा वाजता श्री महादेवाची धार्मिक पुजा मग विधिवत पद्धतीने विवाह सोहळा तर बुधवारी भर जत्रा दुपारी तीर्थ तसेच रात्रौ छबिना असे धार्मिक कार्यक्रम आहेत. यात्रेला पारंपरिक पद्धतीचा ऐतिहासिक वारसा आहे. जंजिरा संस्थानच्या सिद्दीची आई ही महादेवाची भक्त होती असा उल्लेख आहे. तर यात्रेचे मानसन्मान हे शिवकालीन असल्याचे सांगितले जाते. पेशवे आणि सिध्दी यांच्यात झालेल्या करारात या तळाधर यात्रेचा उल्लेख असल्याचे बोलले जाते.
या महादेवाची यात्रा, उत्सव सोहळ्यासाठी लहान मुलांची खेळणी, फुगेवाले, चक्री, आगस पाळणे, तसेच मौत का कुंवा मोटर सायकल, तसेच विविध खेळ तसेच मिठाईवाले,चहा नाष्टा वडापाव आईस्किम असे विविध प्रकारचे दुकाने तसेच व्यवसायिक यांनी आपली व्यवसाय करण्यासाठी दुकाने थाटली आहेत तर या पंचक्रोशीतील नियोजन समिती, दक्षता कमिटी ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.