कोलाड (श्याम लोखंडे) :
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित स्वच्छता मोहीमेत 1078 श्रीसदस्यांसोबत 141 सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत रोह्यातील 35.9 टन कचरा गोळा केला. सदर कचरा डम्पिंग ग्राउंड मध्ये नेण्यात येऊन त्याची योग्य व्हिलेवाट लावण्यात आली. यावेळी रोह्यातील सरकारी कार्यालयांची आवारे, प्रमुख रस्त्यांसह शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमुळे रोहा शहराने आज मोकळा श्वास घेतला.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांचे तर्फे रविवारी सकाळी स्वच्छता अभियान घेण्यात आले. हे स्वच्छता अभियान म्हणजे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना श्रीसदस्यांनी उत्स्फूर्तपणे केलेले विनम्र अभिवादन आहे. या उपक्रमात रोह्यातील एकूण 14 सरकारी कार्यालयांची आवारे, शहरातील संपूर्ण रस्ते, बस स्थानक, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या अभियानात एकूण 1219 मनुष्यबळ सहभागी झाले होते, त्याबरोबर ट्रॅक्टर, टेम्पो, पिकअप, घंटागाडी आदी वाहनांचा वापर करून एकूण कचरा 35.9 टन गोळा करण्यात आला.
यावेळी रोहा नायब तहसीलदार राजेश थोरे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, वन अधिकारी विकास भांबरे, पोलिस ठाण्याचे एपीआय रावडे, रोहा आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार, बीएसएनएल च्या सुवर्णा कदम, वैद्यकीय अधिकारी नागेश मेर्थ आदींसह रोहा शहरातील श्रीसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.