रुसलेली लालपरी नागोठणे शहरात प्रवेश करेल का..?

रूसलेली लालपरी नागोठणे शहरात प्रवेश करील का ?
नागोठणे (महेंद्र माने) :
एसटी स्थानकाशी लांब पल्ल्याच्या लाल परीला (एस.टी.) बसेसचे वावडे असून या रूसलेल्या बसेस शहरात प्रवेश करीत नाहीत. सदरील बसेस शहराच्या बाहेर महामार्गावर थांबत असल्याने अबालवृध्दांसह विद्यार्थी व प्रवाशांना साधारण एक दीड किलो मीटर पायपीट करावी. तसेच रात्री अपरात्री प्रवास करून महामार्गावर उतरून शहरात येणार्‍या प्रवाशांची वाटेत लूटमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरील बसेस शहरात आणण्याची मागणी प्रवाशी वर्ग करीत आहेत.
नागोठणे हे शहर औद्योगिक क्षेत्र तसेच येथील एस.टी.स्थानक म्हणजे राज्य परिवहन मंडळाचे मध्यवर्ती ठिकाण. या ठिकाणी अनेक कंपन्या असून येथील कामगार तसेच शहरातून कामानिमित्त मुंबई, श्रीवर्धन, महाड – पोलादपूरसह कोकणात गावी जाण्यासाठी प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे.पूर्वी सर्व लांब पल्याच्या गाड्या या स्थानकामध्ये ये – जा करीत असत. आता तर सर्वच लांब पल्ल्याच्या आगारातून भरपूर बसेस सदरील मार्गावरुन सोडल्या जात असल्या तरीही कोरोना काळात सर्व वाहतूक बंद होती. त्यानंतर वाहतूक पूर्व पदावर झाल्यापासून सदरील बसेस शहरात येण बंद झाल्या,तेव्हा पासून येथील प्रवाशांची कुचंबना होत आहे.
पर्यायी मार्ग म्हणून त्यांना साधारण एक दीड किलो मीटर पायपीट करीत शहरा बाहेरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून बसेस पकडावी लागते. तेथेही सर्वच बसेस थांबतातच असे नाही. काही काही बसेस तर समोर प्रवाशी हात दाखवत उभे असले तरीही दुर्लक्ष करीत बस पळवत असतात.(अधीकृत थांबा असताना देखील) बराच वेळ वाट बघितल्यावर एकाद्या बसमध्ये नागोठणे येथे उतरणारा प्रवाशी असला तर बस थांबते व मास्तर आरोळी देतो, बसायला जागा नाही, अमुक अमुख ठिकाणी बस जेवायला थांबणार आहे. नाईलाजस्तव प्रवाशी बसमध्ये चढतात. कारण वेळेवर बस न मिळाल्याने पुढे मुंबई,पनवेल कडून परराज्यात जाणारी बस किंवा रेल्वे चुकण्याची भीती अधिक असते.
तसेच या ठिकाणी प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारची निवारा शेड नसल्याने वयोवृध्द,लहान मुले,महिलांसह शाळा- कॉलेज विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात कडक उन्हात तर पावसाळ्यात मुसळधार पावसात उभे राहावे लागते. त्याच प्रमाणे मुंबई किंवा कोकणातून कोणी प्रवाशी रात्री अपरात्री या ठिकाणी उतरला तर शहरात येण्यासाठी रीक्षा मिळणे मुश्किल होते; जर का मिळालीच तर त्याचे भाडे सर्वसामान्य लोकांना न परवणारे असते.शिवाय चालत यायचं तर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या दहशतीसह चोरांकडून लूटमार होण्याची भीती अधिक असते.
या सर्व समस्यांना येथील प्रवाशांना सामोरे जावे लागते. यातून सुटका होण्यासाठी लांब पल्ल्याच्या सर्व बसेस पूर्वी सारख्या शहरात येणे गरजेचे असल्याने त्या बसेस शहरात आणण्याची मागणी प्रवाशी वर्गांकडून जोर धरत असून येथील स्थानिक लोक प्रतींनिधींनी (कदाचित ते बसने प्रवास करीत नसल्याने) लक्ष देत नसले तरीही संबंधित अधिकारी याकडे निश्चित लक्ष देतील असा विश्वास येथील प्रावाशांना आहे.
अपघात होण्याची भीती 
महामार्गावरून बस पकडण्यासाठी मुंबईकडील सर्व प्रवाशी नागोठणे फाटा तर कोलाडकडे कडील सर्व प्रवाशी पलीकडे उभे असतात,दोन्ही ठिकाणे हे वळणावर असल्याने भरधाव वेगात येणार्‍या गाड्यांना उभे असलेले किंवा रस्ता ओलांडत असलेले प्रवाशी तसेच प्रवाशांना आलेली वाहने दिसत नसल्याने तसेच ही समस्या रात्री अपरात्री उतरणार्‍या प्रवाशांमध्ये जास्त प्रमाणात असल्याने त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असून, अपघात झाल्यास जबाबदार कोण ? असा सवाल प्रवाशी विचारत आहेत.
लाडक्या बहीणींची खंत 
रात्री अपरात्री एकटी महिला प्रवास करीत असेल व तिने गाडी नागोठणे शहरातील एस.टी. स्थानकात नेण्याची विनंती केली तर वाहकाची नकार घंटा ऐकायला मिळत असून गाडी आत जात नाही आम्ही तुम्हाला महामार्गावरील नागोठणे फाटा येथेच उतरविणार असल्याबाबतच्या प्रतिक्रिया लाडक्या बहिंणीकडून ऐकायला मिळत आहे.
—————————————————-
नागोठणे स्थानकात कोरोना महामारी पूर्वी पनवेल,मुंबईकडे जाण्यासाठी महाड आगार – 08, श्रीवर्धन आगार –07, माणगाव आगार -18 अशा साधारण 33 ते 35 बसेस तसेच मुंबई पनवेल कडून 33 ते 35 बसेस यायच्या. कोरोना काळानंतर पनवेलकडे जाण्यासाठी आजपर्यंत महाड आगार – एकही बस नाही, श्रीवर्धन आगार – 02, माणगाव आगार – 08 अशा साधारण 10 ते 12 बसेस, मुंबई कडून महाड आगार – एकही बस नाही, श्रीवर्धन आगार – 01,माणगाव आगार – 03 अशा साधारण 04 ते 05 बसेस येतात. यासर्व साध्या बसेस असून शिवशाही,सेमी लक्झरी,रातराणी तसेच कोकणातून येणार्‍या बसेसचा समावेश नाही. येथून पनवेलकडे पहिली बस सकाळी 06.30 वा. रोहा धुळे व संध्याकाळी शेवटची बस 07.00 वा.रोहा मुंबईकडून पहिली बस सकाळी 8.15 वा बोरीवली महाड (माणगाव आगार) व शेवटची बस रात्री 08.30 वा. पनवेल रोहा येत असते. त्यानंतर कोणतीही बस नागोठणे स्थानकात येत नाही. दिवसभरात मुंबई व माणगाव बाजुकडे जाणार्‍या बसेसची शेकडो प्रवाशी चौकशी / विचारणा करीत असतात.
…प्रसाद पाटील,  वाहतूक नियंत्रक,
   नागोठणे एस.टी. स्थानक
—————————————————-
नागोठणे स्थानकात सर्व बसेस येणे गरजेचे- नागोठणे स्थानकात शिवशाही व स्लीपर बस वगळता बाकीच्या सर्व बसेस येणे गरजेचे आहे.याबाबत सर्व आगार नियंत्रक (मॅनेजर ) यांना सर्व गाड्या परस्पर महामार्गावरून न नेता नागोठणे स्थानकात नेण्याबाबत पत्र व्यवहार करून सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरीही ज्या बसेस नागोठणे स्थानकात येत नाहीत याची चौकशी करण्यात येईल.
…दीपक घोडे, रायगड विभाग नियंत्रक,
   एस.टी.महामंडळ, रायगड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading