रायगड जिल्ह्यात वाहतुकीच्या नियमभंगावर पोलिसांचा दंडात्मक बडगा; वर्षभरात ११ कोटींच्या पुढे दंड वसुली

Trafic Police
रायगड :
मुंबई-गोवा महामार्ग हा महाराष्ट्र आणि गोवा राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गासह रायगड जिल्ह्यातील विविध लहान-मोठ्या राज्यमार्गांवर आणि शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या वाढत्या वाहतुकीमुळे वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, अनेक वाहनचालकांकडून सातत्याने नियमभंग होत असल्यामुळे अपघात, वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत.
या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार आणि वाहतूक शाखेचे जिल्हा पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांची तैनाती करण्यात आली. ठिकठिकाणी पोलिस चौक्या उभारून आणि महत्त्वाच्या ठिकाणी लक्ष ठेवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत एकूण 1,31,887 वाहनांवर कारवाई करत 11 कोटी 62 लाख 250 रुपये इतकी दंडात्मक वसुली करण्यात आली आहे. यामध्ये दुचाकी, तीन चाकी, चारचाकी गाड्या, स्कूल बस, टुरिस्ट बस आणि अवजड वाहनांचा समावेश आहे.
तुलनात्मकदृष्ट्या, गतवर्षी (एप्रिल 2023 ते मार्च 2024) रायगड वाहतूक शाखेने 1,14,448 वाहनांवर कारवाई करत सुमारे साडेसात कोटी रुपयांची दंडात्मक वसुली केली होती. यावर्षी कारवाईची संख्या आणि वसुली या दोन्हीत लक्षणीय वाढ झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील वाढत्या वाहतुकीचा ताण, पर्यटन स्थळांची गर्दी, ऐतिहासिक गडकिल्ले आणि उद्योगधंद्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी लक्षात घेता ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे. वाहतुकीच्या शिस्तीचा प्रभावी अंमल आणि अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading