
नागोठणे ( महेंद्र माने ) :
भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या विद्यासंकुलनात नव्याने सुरू होत असलेल्या श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक रुग्णालय व कॉलेजबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांनी रायगड जिल्हयातील ग्रामीण भागातील कुशल डॉक्टरांच्या निर्मितीसाठी सुरू होत असलेले हे पहिले आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला संस्थेचे सीईओ कार्तिक जैन, कॉलेज डिन डॉ.ज्योती जगताप, कॉलेज रजिस्टार वैभव नांदगावकर यांच्यासह डॉ.संदेश शिंदे, डॉ.अमेय केळकर, डॉ.रेश्मा मढवी, डॉ.अक्षय ठाकुर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना किशोर जैन यांनी सांगितले की, हे विद्यासंकुल कोविड काळात जनतेच्या सेवेसाठी देण्यात आले होते, तेव्हा येथील ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यासाठी एका रुग्णालय व मेडिकल कॉलेज बांधण्याचं माझं स्वप्न आज पूर्ण होत असून हे कॉलेज रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले कॉलेज आहे.
आयुर्वेदिक कॉलेजमधुन शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वत:चा दवाखाना तसेच सरकारी नोकरी करू शकतात. तसेच आरोग्य व्यवस्थेमध्ये अनेक ठिकाणी डॉक्टरांची कमतरतापूर्ण करू शकतात. या कॉलेजसाठी NCISM तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अनेक नियम व अटींची पूर्तता करून परवानगी घ्याव्या लागल्या.त्यानंतर NCISM, दिल्ली केंद्र सरकार कडून मान्यता मिळते. या वर्षी केंद्र सरकारने देशभरात आयुर्वेदिक कॉलेजसाठी दिलेल्या मान्यतेमध्ये मुंबई ते तळ कोकणात फक्त आपल्यालाच मान्यता मिळाली आहे.
येथील ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यासाठी सर्व सुविधेसह 100 बेडचे रुग्णालय बांधण्यात येणार असून कोकणात आयुर्वेदिक वनस्पती खूप असून येथील आदिवासी व शेतकरी बांधवांच्या हाताला काम मिळावे यासाठी त्या वनस्पतीची निर्मिती करून त्याचा उपयोग प्रयोग शाळेत औषध व त्यासाठीच्या कच्च्या मालासाठी करणार आहोत. मेडिकल कॉलेजमध्ये ज्यांनी अर्ज केलेत व ज्याला मेरीट व सीईटी मध्ये जास्त मार्क असतील त्यालाच ॲडिशन मिळणार असल्याने येथील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करून प्रवेश घेण्याचे आवाहन जैन यांनी केले. परदेशातील विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी मेडिकल व्हीजा मिळत असून भारत आयुर्वेदाचा देश असल्याने परदेशी विद्यार्थिही येथे प्रवेश घेऊ शकतात.
या वर्षी आपल्या कॉलेजमध्ये 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देणार असून पहिल्या फेरीत विविध राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून सरकारी नियमाने प्रवेशाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक नोव्हेंबरला कॉलेज चालू होणार असल्याचे सांगून येथील विद्यार्थ्यांसाठी अद्यावत सर्व सुखसोईंचे वसतिगृह होणार असल्याचे शेवटी किशोर जैन यांनी सांगितले. डॉ.जगताप यांनी आयुर्वेदातील उपचार पद्धती बाबत परिपूर्ण माहिती देऊन आयुर्वेदिक उपचाराने रोग बरा होण्यास वेळ लागतो पण त्याचे निदान कायम स्वरूपी होत असल्याचे सांगून आपले शरीर व्यवस्थित असेल तर आपण सर्व गोष्टींचा उपभोग घेऊ शकणार असल्याचे सांगितले.