रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान राहिले असून, दुपारी तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. याच दरम्यान, शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने तालुक्याच्या विविध भागात हजेरी लावली.
पेण शहराच्या काही भागांत पावसाचा जोर अधिक असल्यामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. अवकाळी पावसाबरोबर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे संपूर्ण तालुक्यात मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले.
ग्रामीण भागात वाऱ्याच्या जोरामुळे अनेक घरांची पत्रे उडाली, काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या, शाळा व अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींनाही याचा फटका बसला. याशिवाय, अनेक विद्युत खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून, यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शेतीसुद्धा या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहे. वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भाजीपाला, आंबा, काजू यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः आंबा आणि काजू पिके सध्या तयार अवस्थेत असताना त्यावर पावसाचा फटका बसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वीटभट्टी व्यवसाय सुरू आहे. अनेक ठिकाणी वीट तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक आलेल्या पावसामुळे तयार होत असलेल्या वीटांचेही नुकसान झाले आहे. ओलावा आणि पावसामुळे वीटांचा दर्जा खराब झाल्याने व्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पावसाचा हा फटका लक्षात घेता शासनाने त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी आता गावोगावून होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.