
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारतर्फे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण महिना अभियान राबविण्यात येत आहे. रायगड जिल्हा परिषदेने या अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावली. जिल्ह्यात या अभियानाला उत्तम लोकसहभाग मिळाल्याने मागील सलग तीन वर्ष रायगड जिल्हा राज्यात पहिल्या पाच क्रमांकामध्ये राहिला आहे. या कामगिरीबद्दल रविवारी (ता.१३) मुंबई मलबार हिल येथील सह्याद्री अतिथी गृह येथे रायगड जिल्हा परिषदेला पुरस्कार देऊन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी पुरस्कार स्वीकारला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी पोषण महिना अभियान यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन व मार्गदर्शन केल्याने हे यश प्राप्त झाले आहे.
माता आणि बालके सदृढ रहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी पोषण महिना अभियान दरवर्षी सप्टेंबर महिन्यात राबविण्यात येते. या अभियानांतर्गत महिनाभरात रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व अंगणवाडी केंद्रात विविध उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये मातेला पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्यपणे पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपायांचा व उपक्रमांचा त्यात समावेश आहे.
तसेच या अभियानांतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन कालावधी दरम्यान हात स्वच्छ धुण्याचे महत्व पटवून देण्यात येते. तसेच माह कालावधीत गावांमध्ये प्रभातफेरी काढून आरोग्य व पोषण विषयक संदेशाचा प्रचार व प्रसार करण्यात आला. त्याचप्रमाणे अनेमिया मुक्त भारत कार्यक्रमाअंतर्गत नियुक्त केलेल्या शाळांच्या नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने पोषण माहमध्ये नियमितरीत्या शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजन दरम्यान लोहयुक्त गोळ्यांचे वाटप व सेवन होईल या पद्धतीने काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण माह कालावधी दरम्यान एक टी-3 कॅम्पचे आयोजन करून विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात येते. तसेच पोषण माहमध्ये एएनएम आणि आशा स्वयसेविका यांनी गृहभेटी देऊन जनजागृती करण्यात आली. पोषण महिना कालावधीमध्ये अंगणवाडी स्तरावर एक समुदाय आधारित कार्यक्रम, ग्राम आरोग्य स्वच्छता पोषण दिवस व बालक संगोपन आधारित पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या समन्वयाने पोषण माह कालावधीमध्ये सॅम बालकांच्या व्यवस्थापणासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्राचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमात लोकसहभाग घेण्यात आला.
पोषण महा अंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार १२३ अंगणवाड्यांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाला. यामुळे मागील तीन वर्ष रायगड जिल्हा राज्यात प्रथम पाच क्रमांकामध्ये राहिला आहे. २०२२ मध्ये द्वितीय, २०२३ मध्ये तृतीय तर २०२४ मध्ये रायगड जिल्ह्याने चतुर्थ क्रमांक पटकाविला. या तीनही वर्षांचे पुरस्कार वितरण सोहळा रविवारी पार पडला. यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते महिला व बालविकास विभाग सचिव डॉ.अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा परिषदेला गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी पनवेल बालविकास प्रकल्प अधिकारी प्रविण पाटील, उरण बालविकास प्रकल्प अधिकारी स्नेहा चव्हाण उपस्थित होते.