रायगडात पालकमंत्रीपदा नंतर जिल्हा नियोजन समिती वरून वाद होण्याची शक्यता?

Shivsena X Ncp
मुंबई (मिलिंद माने) :
महाविकास आघाडी सरकार नंतर महायुती सरकारमध्ये देखील पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात झालेला वाद अद्याप प्रलंबित असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता व्यक्त होत असून रायगडात पालकमंत्रीपदा नंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत किंवा बैठकीपूर्वी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून असलेला वाद पुन्हा महायुती सरकारमध्ये उफाळून आला असून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा पूर्वीचा वाद आता नव्याने चालू झाला आहे. त्यातच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जिल्हा नियोजन समितीचा वार्षिक आराखडा राज्य नियोजन मंडळाकडे मंजुरीसाठी पाठवायचा असतो त्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली घेऊन हा आराखडा मंजूर करून राज्य सरकारच्या नियोजन समितीकडे पाठवणे गरजेचे असते.
जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदार व खासदार हे नामनिर्देशित सदस्य असतात तर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध सदस्य असतात मात्र राज्यात मागील दोन ते पाच वर्षापासून सर्वच ठिकाणी जिल्हा नियोजन समित्या अस्तित्वातच नाहीत कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणामुळे प्रलंबित असल्याने जिल्हा नियोजन समिती वर फक्त आमदार ,खासदार हे निमंत्रित सदस्य आहेत.
नामनिर्देशित सदस्यांचे निमंत्रण रद्द!
राज्यातील महायुती सरकारने सत्तेवर आल्यानंतर राज्यातील जिल्हा नियोजन समितीवर जेवढे नामनिर्देशन सदस्य आहेत त्यांचे निमंत्रण रद्द करून नव्याने नामनिर्देशित सदस्य प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांनी नियुक्त केले आहेत त्यातच रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरून चाललेला वाद पाहता जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील उरण, पनवेल व पेण या मतदारसंघात भाजपाचे आमदार तर कर्जत अलिबाग व महाड या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार तर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे या आमदार महिला व बालविकास मंत्री आहेत.

रायगड जिल्ह्यातल्या ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे खासदार आहेत तर रायगड जिल्ह्यातल्या कर्जत ,उरण व पनवेल या तीन विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या मावळ लोक सभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत तर राज्यपाल नियुक्त मध्ये भाजपाचे विक्रांत पाटील तर कोकण शिक्षक मतदार संघातून भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे तर पदवीधर मतदार संघातून भाजपाचे निरंजन डावखरे व राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा पाटील असे भाजपाचे संख्याबळ असलेले लोकप्रतिनिधी रायगड जिल्ह्यात आहेत.

बीड जिल्ह्यासारखा प्रकार रायगडात होणार का?
राज्यात महायुती सरकार सत्तेत असतानाही बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मुंडे यांना हटवून त्या जागी बीडचे पालकमंत्री पद हे अजितदादा पवार यांच्याकडे दिल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळ सदस्यांमधून नाम निर्देशित करायच्या सदस्या मधून राष्ट्रवादी च्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपाच्या कोट्यातून नमिता मुंदडा यांना घेऊन भाजपाचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांना टाळले आहे तसाच प्रकार पुणे जिल्ह्यात देखील झाला आहे पुणे जिल्ह्यातून शिवसेना शिंदे गटाचे एकमेव निवडून आलेले पुरंदरचे आमदार व माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची देखील जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्य पदावर नियुक्ती केली नाही त्याचीच पुनरावृत्ती रायगड जिल्ह्यात होण्याची शक्यता राजकीय गोटातून व्यक्त केली जात आहे.
राज्यात महायुती सरकार आल्यानंतर राज्यातील सर्व नियोजन समित्या वरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या परिणामी केवळ पालकमंत्री जिल्हाधिकारी हेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहिले आहेत त्यातच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काही दिवस शिल्लक असताना जिल्हा नियोजन समितीचा वार्षिक आराखडा मंजुरीसाठी राज्य नियोजन मंडळाकडे पाठवण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक होणे अपेक्षित आहे. ही बैठक नेमकी कुठल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार याबाबत अध्यापित अस्पष्ट असतानाच जिल्हा नियोजन समिती वर नामनिर्देशित सदस्य पदावरून कोणाला डावलले जाते व कोणाला निमंत्रित केले जाते हा वाद देखील लवकरच रंगणार असल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात पाहण्यास मिळणार आहे.
होळी पूर्वीच रायगडात राजकीय शिमगा? मुद्द्याची लढाई गुद्द्यावर येणार?
राज्यातील महायुती सरकारने राज्यातील ३६ जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केल्या होत्या मात्र रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वादाची लढाई झाल्याचे चित्र राज्यात पाहण्यास मिळाले त्यातच रायगडात राष्ट्रवादीच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाचे महाडचे आमदार गोगावले यांनी नाराजी व्यक्त करून त्यांच्या समर्थकांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून दोन तास आंदोलन करून रास्ता रोको केला होता तसेच दररोज वादग्रस्त विधाने रायगड जिल्ह्यातील शिंदे गटातील महाड ,अलिबाग व कर्जत येथील आमदारांनी केल्याने त्याला प्रत्युत्तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देण्यात आल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर कलगीतुरा रंगला होता आता जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यांच्या नामनियुक्तीवरून पुन्हा रस्त्यावरील लढाई मुद्द्यावरून गुद्द्यावर आल्यात नवल नसल्याची प्रतिक्रिया एका राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी अभूतपूर्व बंदोबस्त असणार?
रायगड जिल्हा नियोजन समितीचा वार्षिक आराखडा मंजूर करण्यासाठी व तो राज्य नियोजन मंडळाकडे पाठवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता गृहीत धरता व पालकमंत्री कोण हा वाद असताना ही बैठक रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात होणार आहे या बैठकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट दोन्ही समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची फौज जमा केली जाण्याची शक्यता गृहीत लक्षात धरता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी अलिबाग येथे अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading