रामधरणेश्वर डोंगरावर रविवारी दुपारी मानवनिर्मित लागलेल्या वणव्यात वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी

Onava Aag
अलिबाग/सोगाव ( अब्दुल सोगावकर ) : 
अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर डोंगरावर विस्तृत स्वरूपात असलेल्या जंगल भागात रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी दुपारनंतर वणवा लागून मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून नष्ट झाली आहे. याबाबत पर्यावरण प्रेमी व निसर्गमित्रांनी हळहळ व्यक्त केली आहे. हा लागलेला वणवा वनविभागाच्या वनकर्मचारी व पर्यावरण प्रेमी यांच्या अथक प्रयत्नाने काही वेळाने आग विझविण्यात यश आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवार दि.१७ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास रामधरणेश्वर डोंगरावर मोठ्या वणवा लागला होता, याबाबतची माहिती मुनवली येथील पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना समजताच त्यांनी पत्रकार सोगावकर यांना वणव्याची माहिती दिली. यावेळी पत्रकार यांनी अलिबाग वनविभागाचे अधिकारी तुकाराम जाधव यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून वणवा लागल्याची माहिती दिली असता त्यांनी काही वेळात वनकर्मचारी यांना पाचारण केले. यावेळी वनकर्मचारी यांच्यासोबत पर्यावरण प्रेमी सचिन घाडी यांनीही निसर्ग प्रेमापोटी डोंगरावर वणवा लागलेल्या ठिकाणी जाऊन वणवा विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.
यावेळी मात्र लागलेली आग विझवेपर्यंत मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे, याठिकाणी रामधरणेश्वर डोंगराच्या आजूबाजूच्या गावातील गायी, बैल, म्हशी व बकऱ्या आदी हजारो जनावरे मोठ्या प्रमाणात चरत असतात, वणव्यावेळी मोठ्या प्रमाणात गुरे भयभीत होऊन हंबरडा फोडत सैरावैरा पळत होते. या घटनेमुळे गुरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, जनावरांचा चारा जळून गेल्यामुळे शेतकरी व गुरेमालक मोठ्या संकटात सापडले आहेत. या भागात औषधी वनस्पती, रान मेवा मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचेही जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने यावर उपजीविका करणाऱ्या आदिवासी बांधवांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
वणव्यामुळे या भागातील बहुतांश जंगली प्राण्यांचे अधिवास व खाद्य नष्ट झाले आहे, यामुळे हे जंगली प्राणी खाद्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वाटचाल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही दिवसांपासून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावांत जंगलातील बिबटे, माकडे, सरपटणारे विषारी व बिनविषारी प्राणी मानवी वस्ती असलेल्या ठिकाणी निदर्शनास येत असल्याचे प्रमाण वाढले आहेत.
यावेळी रामधरणेश्वर डोंगरावर वणवा विझविण्यासाठी सचिन घाडी यांच्यासह वनमजुर नागेश काष्टे, वनरक्षक सौरभ पाटील, कनकेश्वर वनविभागाचे वनमित्र निहार पाटील हे वेळीच धावून आल्यामुळे निसर्गाची व नैसर्गिक संपत्तीची होणारी हानी काही प्रमाणात रोखण्यात यश मिळविले, याबद्दल त्या सर्वांचे पर्यावरणप्रेमीं व निसर्गप्रेमींनी आभार मानले आहेत.
याप्रसंगी पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले की, रविवारी रामधरणेश्वर डोंगरावर थोड्या थोड्या अंतरावर जाणूनबुजून आग लावण्यात आली होती, हि मानवनिर्मित लावलेली आग अज्ञात समाजकंटकांने जाणूनबुजून व निसर्ग साधनसंपत्तीचे नुकसान करण्याच्या हेतूने लावली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या आगीमुळे या परिसरात आदिवासींची मोठ्या प्रमाणात घरे असल्याने त्यांना धोका निर्माण झाला होता, वेळीच आग विझविण्यात यश आल्यामुळे सध्यातरी मोठा अनर्थ टळला आहे. यापुढेतरी वनविभागातर्फे या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात गस्त वाढवून जंगलातील नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून असणाऱ्या हजारो गुरे, जंगली प्राणी आदी प्रत्येक सजीव असणाऱ्या प्राणी व जीवजंतूचे अधिवास तसेच त्यांच्या खाद्याचे रक्षण करण्यासाठी कडक पाऊले उचलण्याची गरज आहे.
मागील काही वर्षे वणवा लावण्याचे प्रमाण वाढले आहेत, वनविभागाने याठिकाणी जाळरेषा काढण्याची गरज आहे, जेणेकरून वणव्यामुळे नुकसान होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, आतापर्यंत वणवे लावणाऱ्या समाजकंटकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, हे वनविभागाचे सपशेल अपयश आहे. जंगल हे राष्ट्रीय संपत्ती आहे आणि या राष्ट्रीय संपत्तीला आग लावणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन वनविभागाने कडक कारवाई करावी तसेच यापुढे पर्यावरणाची हानी होऊच नये यासाठी कठोर पावले वनविभागाने उचलावी, अशी संतप्त मागणी पर्यावरणप्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी अलिबाग वनविभागाला केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading