राजकीय क्षेत्रात मोठी घडामोड! शेकाप फुटीच्या उंबरठ्यावर; जयंत पाटील यांना बसणार मोठा धक्का

Damase
कर्जत ग्रामीण (मोतीराम पादीर) : 
 कर्जत तालुक्यात राजकीय गोटात खळबळ माजवून देणारी घटना समोर येत आहे. तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष  नामधारी उरला असताना आता फुटीच्या उंबरठ्यावर येवून पोहचला. त्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्यात शेकाप शिल्लक राहील का? असा प्रश्न  यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नारायण डामसे शेकापला रामराम करीत आपल्या समर्थकांसह बाहेर पडणार आहेत. दरम्यान नारायण डामसे कोणता झेंडा हाती घेणार म्हणून चर्चा आहे.
 अनेक काळ रायगड जिल्हावर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व राहिले आहे.परंतु मागील काही वर्षात या शेकापच्या बालेकिल्लात शेकापला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावे लागत असून अनेक दिग्गज राजकीय नेते शेकापला सोडून दुसरी राजकीय वाट धरत आहेत. त्यातच जिल्ह्यातील कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शेकापची अवस्था बिकट असल्याचे चित्र आहे. कर्जत तालुक्यातील शेकाप नाम मात्र शिल्लक असताना शेकाप मधून नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे.कर्जत विधानसभा 2024 निवडणूक पार पडल्यानंतर शेकाप मध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली होती.
शेकापचा दोन दिग्गज राजकीय नेत्यांनी सोयीनुसार राजकारण करीत दोन वेगवेगळ्या उमेदवारांचे काम केले होते. याला कारण पक्षाचे चिटणीस जयंत पाटील असल्याची चर्चा होती. महाविकास आघाडी सोबत राहून शेकाप मधील या  नेत्यांनी विरोधी पक्षाचे काम केले होते. ही परिस्थिती जिल्ह्यात दिसून आली परिणाम महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही उलट शेकापवर आता अस्तित्व टिकविण्याची वेळ आयोजित आत्मचिंतन बैठकीच्या माध्यमातून दिसून आली.
 सध्या कर्जत मतदारसंघात ठराविक ग्रामपंचायत स्थरावर शेकापचे कार्यकर्ते शिल्लक आहेत. त्यातच जिल्हा समाज कल्याण सभापती पदावर दोन वेळा राहिलेले आणि शेकापचे कट्टर म्हणून ओळख असलेले कर्जत मधील शेकापचे नारायण डामसे हे मागील विधानसभा निवडणुकी नंतर नाराज असल्याचे समोर आले होते. जयंत पाटील यांनी कर्जत मध्ये निवडणुकीनंतर अनेक वेळा भेट घेत बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची संवाद साधला होता. या दरम्यान नारायण डामसे हे कुठेच दिसून आले नव्हते. एरव्ही जयंत पाटील यांच्या मागे पुढे धावणारे डामसे कुठल्या कोपऱ्यात दिसले नाही. याची चर्चा देखील झाली. डामसे यांचे जवळचे विश्वासू सहकारी कार्यकर्ते कार्यक्रमात दिसत असल्याने डामसे आले नाहीत म्हणून जयंत पाटील यांनी विचारणा देखील केली.
दरम्यान डामसे यांची कशेळे येथे कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली असल्याचे समजते. यावेळी त्यांचे निकटवर्तीय विश्वासू सहकारी होते. डामसे शेकापला राम राम करण्याच्या तयारीत असल्यानेच ही बैठक महत्वपूर्ण समजली जाते. दरम्यान नारायण डामसे शेकाप सोडून कोणता झेंडा हाती घेणार हा ही प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीत डामसे यांनी परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचे काम केले होते. त्याच दुसऱ्या बाजूला शेकापचे कर्जत चिटणीस राम राणे यांनी आमदार थोरवे यांचे काम केले होते. त्यामुळे आता डामसे थोरवे यांच्याकडे जाणार की घारे सोबत जाणार म्हणून चर्चा. डामसे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करीत होती.
 डामसे यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता घारे यांच्या सोबत राहणे फायदेशीर ठरेल कारण घारे यांना ग्रामीण भागातून चांगल्या प्रकारे निवडणुकीत मते मिळाली होती. त्यामुळे डामसे घारे सोबत जातील अशीच शक्यता वाटत आहे. दुसऱ्या बाजूला डामसे सुनील तटकरे यांच्या संपर्कात देखील असल्याचे समजते.
 एकूणच तालुक्यात शेकापला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. डामसे यांच्यासोबत नेरळ जिल्हा परिषद वार्ड, पाथरज जिल्हा परिषद आणि कळंब जिल्हा परिषद वार्ड मधील विश्वासू कार्यकर्ते मोठ्या संख्येने शेकापला राम राम करणार आहेत.त्यामुळे आता डामसे कोणता झेंडा हाती घेणार म्हणून पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading