PEN न्यूज ऑनलाइन टीम :
भाजपला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांना पक्षात मोठे स्थान मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, मंत्रीमंडळातून डावलले गेल्याने चव्हाण यांचे राजकीय वजन कमी झाले असल्याची चर्चा रंगत आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम विभागासारखे प्रभावी मंत्रीपद मिळाले होते. त्यांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आणि कोकण प्रांताची जबाबदारीही देण्यात आली होती. त्यामुळे कोकणातील भाजपची पकड मजबूत करण्याचे श्रेय त्यांना मिळाले. मात्र, पक्षश्रेष्ठींनी यावेळी त्यांना मंत्रीपद न देता गणेश नाईक यांना संधी दिली.
चव्हाण यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. मात्र, मंत्रीपद डावलले गेल्याने डोंबिवलीसह त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांच्या मंत्रीपदाचा शहराच्या विकासासाठी फारसा उपयोग झाला नसल्याची टीकाही आता ऐकू येत आहे.