म्हसळा तालुक्यातील पत्रकाराविरूध्द आकसाने कारवाई; कोकण आयुक्तांच्या आदेशावर कारवाईप्रकरणी दिरंगाई, 60 लाख रक्कमवसूलीबाबत जि.प-पं.स.प्रशासनाची बेपर्वाई

dhanase

पोलादपूर ( शैलेश पालकर ) : गेल्या काही दिवसांपूर्वी म्हसळा तालुक्यातील एका पत्रकाराने कोकण विभागीय आयुक्तांमार्फत पांगळोली ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकाविरूध्द 60 लाखांहून अधिक रक्कमेच्या वसुलीसह संबंधित दोषींविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश प्राप्त केले. मात्र, ते आदेश म्हसळा तालुक्यातील पंचायत समिती आणि पोलीसांकडे न पोहोचल्याने आयोजित करण्यात आलेल्या पांगळोली ग्रामसभेला दोषी ग्रामसेवक चालवित असल्याचे पाहून सदर पत्रकाराला ग्रामसेवक आणि पंचायत समितीची यंत्रणा मा.कोकण आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई करण्याऐवजी ग्रामसेवकालाच ग्रामसभा चालविण्यासाठी पाठवित असल्याचा राग आला.

याप्रकरणी ग्रामसेवकाने चक्क तो दोषी ठरूनही ग्रामसभा चालविण्यास उपस्थित राहिल्याची माहिती म्हसळा पंचायत समिती तसेच म्हसळा पोलीसांपासून लपवित केवळ पत्रकाराने ग्रामसभेमध्ये गोंधळ घातल्याची माहिती देऊन त्याच्याविरूध्द तक्रार दिली. यानंतर सदर पत्रकाराला म्हसळा पोलीसांनी भावासह ताब्यात घेऊन पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी देत तडीपारीची तयारी सुरू केली आहे. तब्बल दीड महिन्यांपूर्वी दोषी ठरलेल्या सरपंच व ग्रामसेवकाविरूध्द कारवाईचे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आजतागायत दिले नसल्याने म्हसळा गटविकास अधिकारी यांनी सरपंच व ग्रामसेवकांविरूध्द तक्रार देऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली नाही. तसे केले असते तर अझहर धनसे या पत्रकाराविरूध्द गुन्हा दाखल करण्याची वेळ पोलीसांवर आलीच नसती, अशी म्हसळा तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे.

म्हसळा तालुक्यातील पांगळोली गावांतील अझहर निजामुद्दीन धनसे हा 26 वर्षीय तरूण पत्रकार सत्याच्या मार्गाने आक्रमक विचारसरणीने वृत्तपत्र तसेच युटयूब न्यूज चॅनेल चालवित असून त्याने आरोग्य, पंचायत समिती, महसूल, ग्रामपंचायत तसेच पोलीस आदी खात्यांतील अनेक बाबी जनतेसमोर आणल्या असून यामुळे विविध विभागाच्या प्रशासनावर त्याच्या सत्यवृत्तांची दहशत दिसून येत होती. यावर्षी मार्च 2023 मध्ये पत्रकार अझहर धनसे याने अशरफ दादाखान पठाण व नविद म.सईद धनसे यांच्यासह दाखल केलेल्या अर्जान्वये म्हसळा तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायतीमधील 2016 ते 2022 पर्यंतच्या कालावधीतील ग्रामनिधी 41 लाख 31 हजार 920 रूपये, 14 वा वित्त आयोग 17 लाख 604 रूपये आणि 15 वा वित्त आयोग 1 लाख 68 हजार 492 रूपये असा एकूण रक्कम 60 लाख 1 हजार 16 रूपयांच्या आर्थिक अनियमितेस सरपंच आणि ग्रामसेवक संयुक्तपणे जबाबदार असल्याचा निर्णय मा. कोकण विभागीय आयुक्त यांच्यासमोर सिध्द केले.

याबाबत दि. 14 जून 2023 रोजी मा.कोकण विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या पहिल्या आदेशानुसार रक्कम 60 लाख 1 हजार 16 रूपयांची सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून वसुली करण्यात यावी आणि संबंधित सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर ग्रामविकास विभागाकडील शासन शुध्दीपत्रक क्र. व्हीपीएम-2019-प्रक्र.281-परा-3 दि. 18 सप्टेंबर 2019 नुसार संबंधितांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39(1) अन्वये बिलाल अलि कौचाली सरपंच यांना सरपंच पदावरून काढून टाकण्यात यावे, असा दुसरा आदेश देण्यात आला आहे.

या आदेशाच्या प्रती तक्रारदार पत्रकार अझहर धनसे याने अशरफ दादाखान पठाण व नविद म.सईद धनसे यांच्यासह गैरतक्रारदार बिलाल अलि कौचाली सरपंच यांना रजिस्टर पोस्टाने तर उपसचिव, राज्य निवडणूक आयोग यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी रायगड, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना सदर आदेशाच्या प्रती संबंधितांना बजावून कोकण विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्यासाठी तीन प्रतींमध्ये, म्हसळाचे गटविकास अधिकारी आणि पांगळोलीचे ग्रामसेवक यांना प्रत्येकी एक अशा प्रती पाठविण्यात आल्या. या आदेशामध्ये पांगळोलीचे सरपंच बिलाल अलि कौचाली यांच्या पत्यामध्ये म्हसळा ऐवजी मुरूड तालुका असा उल्लेख आणि पांगळोलीचे ग्रामसेवक गणपती मच्छिंद्र केसकर यांचा उल्लेख एम.जी.केसकर असा दिसून येत आहे.

मात्र, झारीतील शुक्राचार्यांच्या भुमिकेमुळे या आदेशानुसार निर्णय घेण्यासाठी तब्बल दीड महिने विलंब झाला. म्हसळा पंचायत समितीमध्ये कोणीही गटविकास अधिकारी पदावरील व्यक्ती नसल्याने श्रीवर्धनचे गटविकास अधिकारी लेंडी हे गेल्या काही दिवसांपासून प्रभारी कार्यभार पाहात आहेत.  दरम्यान, तब्बल 9 वर्षांहून अधिककाळ पांगळोली येथे असलेले ग्रामसेवक गणपती केसकर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये दि.17 जुलै 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांनी दिलेल्या पत्रानुसार म्हसळा गटविकास अधिकारी यांना विशेष ग्रामसभा घेण्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार म्हसळा गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे आदेश देताना पांगळोली ग्रामपंचायतीच्या दोषी ग्रामसेवकासाठी वेगळा आदेश दिला नव्हता. यामागे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मा.कोकण विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत तीन प्रतींमध्ये निकाल व आदेश पाठवूनही तो आदेश व निकाल म्हसळाचे गटविकास अधिकारी आणि पांगळोलीचे ग्रामसेवक यांना आजतागायत बजाविला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पांगळोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला दि. 24 जुलै 2023 रोजी दोषी ग्रामसेवक गणपती मच्छींद्र केसकर हेच ग्रामसेवक म्हणून उपस्थित राहिले. ग्रामसेवक गणपती केसकर यांच्याविरूध्द दोष सिध्द होऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाचे दीड महिन्यांपूर्वी आदेश जारी झाले असताना ग्रामसेवक पदावरील दोषी व्यक्तीच प्रशासक परशुराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा चालवित असल्याचे पाहून पत्रकार अझहर धनसे याने संतापयुक्त आश्चर्य व्यक्त केले. यावेळी ग्रामसेवक गणपती मच्छिंद्र केसकर यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामसभा लावलेली असल्याचे सांगितले असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले.

मात्र, यावेळी प्रशासक परशुराम पाटील यांना सदर ग्रामसेवकाविरूध्द दोषारोप सिध्द होऊन मा.कोकण विभागीय आयुक्तांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे पत्रकार अझहर धनसे याने सांगूनही प्रशासकांनी दोषी ग्रामसेवकाची उपस्थिती असल्याने सदरची ग्रामसभा तहकूब करण्याऐवजी ग्रामसभा नियमाप्रमाणे सुरू असल्याचे सांगण्याचा प्रयत्न चालविण्याने पत्रकार धनसे यांनी संतप्त प्रतिक्रिया दर्शविली. सदरची घटना सहायक गटविकास अधिकारी मंगेश साळी, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत दिघीकर आणि म्हसळा गटविकास अधिकारी पद बदलीमुळे रिक्त असल्याने प्रभारी कार्यभार सांभाळणारे श्रीवर्धन गटविकास अधिकारी लेंडी यांनी यांच्या कानावर पांगळोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये झालेल्या प्रकाराची तोंडी माहिती देतांना ग्रामसेवक गणपती मच्छिंद्र केसकर याने त्याच्याविरूध्द मा.कोकण विभागीय आयुक्त यांनी दोषी ठरवून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश जारी केला असल्याची बाब लपवून म्हसळा पोलीस ठाण्यामध्ये पत्रकार अझहर धनसे अािण त्याचा भाऊ मुजाहिद धनसे या दोघांविरूध्द तक्रार दिली.

दोषी ग्रामसेवक गणपती केसकर याच्याविरूध्द दीड महिन्यांपूर्वी मा.कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार म्हसळा गटविकास अधिकारी अथवा सहायक गटविकास अधिकारी यांनी फौजदारी गुन्हा दाखल केला असता तो विशेष ग्रामसभेला उपस्थित राहू शकला नसता आणि पत्रकार अझहर धनसे यांच्या नैसर्गिकरित्या संतप्त भावना व्यक्त झाल्या नसत्या. तसेच दोषी ग्रामसेवक गणपती केसकर याने घटना सहायक गटविकास अधिकारी मंगेश साळी, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत दिघीकर आणि म्हसळा गटविकास अधिकारी पद बदलीमुळे रिक्त असल्याने प्रभारी कार्यभार सांभाळणारे श्रीवर्धन गटविकास अधिकारी लेंडी यांनी यांच्या कानावर ग्रामसभेतील अझहर धनसे याने व्यक्त केलेल्या संतापामागील स्वत: दोषी असूनही ग्रामसभा चालविण्यास उपस्थित असल्याची माहिती दिली असता कदाचित या वरिष्ठांनी केसकर यांना फिर्याद देण्यापासून परावृत्त केले असते. आता म्हसळा पोलीसांनी पत्रकार अझहर धनसे आणि त्याचा भाऊ मुजाहिद निजामुद्दीन धनसे यांना स्वातंत्र्यपूर्व काळातील कलमांचा वापर करून पोलीस कोठडीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये अडकवून ठेवल्याची माहिती प्राप्त होत आहे.

तब्बल 60 लाखांच्या आर्थिक अनियमितेचा प्रकार असताना संबंधित तक्रारदार पत्रकार अझहर धनसे याला अडकवून आपआपले उखळ पांढरे करून घेण्याची आयतीच संधी आल्याने पंचायत समिती, ग्रामपंचायत, पोलीस तसेच अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी पत्रकार अझहर धनसे याच्या तडीपारीपर्यंत तयारी सुरू केली आहे. परंतु, ज्या तरूण पत्रकाराने मा.कोकण विभागीय आयुक्तांपर्यंत म्हसळा तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमितता उघडकीस आणली त्याच्या विरोधात एकवटलेले विविध सरकारी खात्यांचे अधिकारी कशास्वरूपाचे असतील, याचा अंदाज व्यक्त करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading