मोस्ट वॉन्टेड ड्रग सिंडिकेटच्या प्रमुखाचा वडील गुरुनाथ चिचकर यांची आत्महत्या; पोलीस जाचाला कंटाळून डोक्यात गोळी झाडली

मोस्ट वॉन्टेड ड्रग सिंडिकेटच्या प्रमुखाचा वडील गुरुनाथ चिचकर यांची आत्महत्या
अलिबाग (अमुलकुमार जैन) :
भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकर याचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांनी आत्महत्या केली आहे. सतत पोलीस चौकशी आणि दबावामुळे त्रस्त होऊन त्यांनी आपल्या राहत्या सिवुड्स एनआरआय येथील गुरुकिरण सोसायटीतील घरात डोक्यात गोळी झाडून जीवनयात्रा संपवली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहा वाजता गुरुनाथ चिचकर आपल्या तळमजल्यावरील कार्यालयात गेले आणि स्वतःच्या बंदुकीतून आत्मघातकी गोळी झाडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांच्या पुतण्याने तातडीने एनआरआय पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलिसांनी एक सुसाईड नोट जप्त केली आहे, ज्यामध्ये पोलिसांकडून होत असलेल्या सततच्या जाचाचा उल्लेख करण्यात आला आहे.
गुरुनाथ चिचकर हे अलिबाग तालुक्यातील असून, त्यांचा कार्लेखिंडजवळ ‘गुरु किरण’ नामक बंगला आहे. घटनेची माहिती मिळताच अलिबाग येथील अनेक राजकीय आणि बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांनी नवी मुंबईतील त्यांच्या घरी धाव घेतली.
नवीन चिचकरच्या विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि मुंबई पोलिसांकडून अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी, सुमारे ₹200 कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते, जे नवीन चिचकरच्या सिंडिकेटशी संबंधित होते. या प्रकरणात त्याचा एक भाऊ अटकेत आहे तर नवीन देशाबाहेर पळून गेला असून त्याच्यावर लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.
गुरुनाथ चिचकर यांना या प्रकरणात वारंवार NRI पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवले जात होते. या मानसिक आणि सामाजिक दबावाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पोलिसांकडून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading