
सोगाव (अब्दुल सोगावकर ) :
अलिबाग तालुक्यातील मूनवली येथे ७ सप्टेंबर रोजी गणपतीचे उत्साहात आगमन झाले होते, ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या..!’ म्हणत गुरुवार दि. १२ सप्टेंबर रोजी मूनवली येथे पाच दिवसीय गणपतीला व गौरीला भावपूर्ण वातावरणात निरोप देत मूनवली येथील तलावाजवळ सामूहिक आरतीनंतर तळ्यात विसर्जन करण्यात आले.
मूनवली पंचक्रोशीतील मूनवली, सोगाव, चोरोंडे, मापगाव, बहिरोळे, बेलवली, मुशेत या परिसरातील शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले होते. गेल्या पाच दिवसांपासून मूनवली पंचक्रोशीत गणेश चतुर्थी निमित्ताने उत्साहाचे वातावरण पसरले होते. या गणेशोत्सवाच्या पाच दिवसात आरती, पूजा, भजन, नाच आदी पारंपरिक पद्धतीच्या कार्यक्रमाची रेलचेल दिसून आली.
विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घरातील आरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली, यावेळी पारंपारिक बेंजो, ढोल ताशाच्या वाद्यासह, ध्वनिक्षेपकावरील संगीत, डीजे संगीत तर काही ठिकाणी भजनाच्या तालावर लहानांपासून ते सर्व गटातील महिला व पुरुष ग्रामस्थ रममाण होऊन विसर्जन मिरवणूकित सहभागी झाले होते. गणपतीची विसर्जन मिरवणुकीत गणपती बाप्पाला काहींनी डोक्यावर घेतले होते तर काहींनी आपल्या वाहनातून शेवटचा प्रवास घडवला, विसर्जनस्थळी शेवटची आरती झाल्यानंतर भावुक वातावरणात गणरायाचे व गौरीचे विसर्जन करण्यात आले. सर्व उपस्थित गणेशभक्तांना यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
सर्वात महत्त्वाचे आणि कौतुकास्पद म्हणजे मूनवली ग्रामस्थांनी निर्माल्य पाण्यात विसर्जन न करता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तिथे असलेल्या निर्माल्य एका टाकीत जमवून ते कंपोस्ट खतासाठी म्हणून उपयोग करण्यात आला. पाच दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मूनवली गावातील सुमारे ४० कुटुंबातील गणपतींचे विसर्जन करण्यात आले, तर ४ गौरींचे यावेळी विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत प्रमुख आकर्षण गोल्डमॅन म्हणून संतोष भगत यांच्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. विसर्जन मिरवणुक शांततेत व उत्साहात पार पडली.