
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
रायगड जिल्ह्यातील शांतताप्रिय मुरुड शहरातील भोगेश्वर पाखाडी येथे १२ सप्टेंबर २०२४ रोजी गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीवर दोन लहान मुलांच्या हातून दगडफेक करण्यात आली होती. या घटनेमुळे मुरुडसह संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोप होत आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी रायगड पोलिसांनी उच्चस्तरीय समिती नेमावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुरुड सकल हिंदू समाजाने रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली आहे.
सदर घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मुरुड पोलिस ठाण्यात हिंदू समाजाच्या काही सदस्यांवर जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक जाणीवपूर्वक करण्यात आली होती. मात्र, पोलिसांना तक्रार दाखल करण्यासाठी २४ तास लागले याबाबत समाजात असंतोष व्यक्त झाला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात दोन लहान मुलांचा समावेश असल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात अडचणी असल्याचे स्पष्ट केले. संविधानानुसार लहान मुलांवर कारवाई होऊ शकत नाही, मात्र संबंधित मुलांच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू असून लवकरच निष्कर्ष समोर येतील, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
घटनेच्या निषेधार्थ मुरुड शहरात महामोर्चा काढण्याची योजना होती, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सकल हिंदू समाजाने मोर्चा रद्द करून पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी मुरुड शहरात आणि आजूबाजूच्या भागात कडक बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि तपास पूर्ण झाल्यावर जनतेला माहिती दिली जाईल, असे आश्वासन दिले.