
माथेरान (मुकुंद रांजाणे) :
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचे,वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर,माथेरान या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात प्रथम क्रमांक पटकवला. त्यामुळे शाळेतील 13 विद्यार्थी आणि एक शिक्षक यांची राज्याबाहेर मध्यप्रदेश, भोपाळ येथे राष्ट्रीय अविष्कार अभियानातांर्गत शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी माननीय शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्याद्वारे निवड करण्यात आली होती.
या अभ्यास दौऱ्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून विशेष प्रविण्य मिळवलेल्या 6 शाळातील एकूण 45 विद्यार्थी आणि 7 शिक्षकांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 13 विद्यार्थी वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर,माथेरान शाळेचे होते. ही सर्व माथेरानकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. शाळेचे विद्यार्थी बाहेर राज्यात रायगड जिल्हा परिषद नव्हे तर आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करत होते ही विशेष बाब होती. या अभ्यास दौऱ्यात 13 विद्यार्थी आणि एक शिक्षक(संतोष चाटसे) यांची निवड मुख्याध्यापक दिलीप आहिरे यांनी केली.
या अभ्यास दौऱ्यात अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक, वैज्ञानिक ठिकाणाना भेटी देण्यात आल्या. नाशिकचे ऐतिहासिक काळाराम मंदिर,सिहोर MP. गहू शेती,राष्ट्रीय विज्ञान केंद्र,भोपाळ,इंदिरागांधी मानवविकास संस्था,विथी भोपाळ,विभागीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषद,भोपाळ,प्रसिद्ध ऐतिहासिक सांची स्तूप,सांची,कर्कवृत रेषा,आशिया खंडातील सर्वात मोठी आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची ताजूल मज्जीद, प्रगैतिहासिक इतिहासाची साक्ष देणारे ठिकाण भीमबेटका इत्यादी मुख्य ठिकाणाना भेटी देण्यात आल्या.
मुख्यमंत्री, माझी सुंदर शाळा उपक्रमात आपल्या शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक यावा यासाठी मा.मुख्याधिकारी राहूल इंगळे यांनी सर्वांतोपरी मदत केली तसेच अधीक्षक सदानंद इंगळे यांनी शाळेला वेळोवेळी भेटी देऊन मोलाचे सहकार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप आहिरे आणि सर्व शिक्षकवृंद यांनी राष्ट्रीय अविष्कार अभियानाअंतर्गत मध्यप्रदेश भोपाळ अभ्यास दौऱ्यावरून परत आलेल्या सर्व 13 विद्यार्थी आणि शिक्षक संतोष चाटसे सर यांचे अभिनंदन केले.