
नागोठणे ( महेंद्र माने ) :
दि.16 ऑक्टोबर 2024 – येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिकणी गावाच्या हद्दीत गुलमोहर हॉटेल जवळ बुधवार 16 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास कंटेनर व टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचे निधन झाले असून एक महिला जखमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार 16 ऑक्टोबर रोजी मुंबई बाजूकडुन भूषण कृष्णा तेलंगे वय 49 वर्षे रा. तळवली वाण्याची ता.रोहा – रायगड हा आपल्या ताब्यातील महेंद्रा कंपनीचा एमएच 06 बीडब्ल्यू 3558 हा कंटेनर मुंबई बाजूकडुन अतिवेगात मुंबई गोवा महामार्गावरून चालवीत नेत असता दुपारच्या सुमारास नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिकणी गावाच्या हद्दीत गुलमोहर हॉटेल जवळ रॉग साईटने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत अति वेगात येऊन समोरून गोवा बाजूकडुन मुंबई बाजूकडे जाणारा एमएच 08 एपी 5982 या टेम्पोला समोरून जोरदार ठोकर मारली.
या अपघातात टेम्पो चालक प्रदीप नारायण कासुर्डे वय 55 वर्षे व हासिना इस्माईल खलफे वय 56 वर्षे दोघेही राहणार पिंपळगाव ता. मंडणगड जि. रत्नागिरी हे दोघे किरकोळ व गंभीर स्वरुपात जखमी झाले. त्यांना नागोठणे प्राथमिक केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मुंबईकडील एमजीएम दवाखान्यात रवाना करण्यात आले. दवाखान्यात नेत असतानाच टेम्पो चालक प्रदीप कासुर्डे हा तेथेच मरण पावला आहे.
या अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहा.पो.नि.सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश भोईर करीत आहेत.