मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पोलादपूर शहरातील पश्चिमेकडील सर्विस रोडची लांबी नियोजित आराखड्यापेक्षा कमी असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पनवेल ते कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गापर्यंतच्या दौऱ्यात प्रस्तुत प्रतिनिधीने निदर्शनास आणून दिल्यानंतर आराखड्यानुसार सर्विस रोड ची लांबी वाढविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. मात्र काही गृह निर्माण प्रकल्पामुळे अद्याप 250 मीटर पर्यंत लांबी कमी असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चे चौपदरीकरण पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाजवळ पूर्णत्वास गेले आहे. मात्र, पोलादपूरच्या पश्चिमेकडील सर्व्हिसरोड आणि त्यावरील ड्रेनेज कम फूटपाथचे काम पूर्ण झाले असून त्या सर्व्हिसरोडची रूंदी 7.50 मीटर्स तर लांबी 1080 मीटर्स तर ड्रेनेज कम फूटपाथची रूंदी 1.5 मीटर्स असल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या अंतिम आराखडयामध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलादपूर शहरातील ग्रामीण रूग्णालयासह पार्टेकोंडपर्यंत सर्व्हिसरोड व ड्रेनेज कम फुटपाथ असूनही हा पश्चिमेकडील सर्व्हिसरोड प्रभातनगर पश्चिमपर्यंतच दिसून येत आहे.
पोलादपूर घाटेआवाड येथे आराखडयानुसार ड्रेनेज कम फूटपाथची रूंदी 1.5 मीटर्स असण्याऐवजी केवळ दोन फूट असलेली दिसून येत आहे. प्रत्यक्षात आणि आराखडयामध्ये असलेल्या लांबी रूंदीतील तफावतीमुळे पश्चिमेकडील सर्व्हिसरोड ग्रामीण रूग्णालयाच्या प्रांगणातून पार्टेकोंडपर्यंत न जाता त्याआधीच प्रभातनगरपर्यंत संपलेला असल्याने ग्रामीण रूग्णालयापर्यंत रूग्ण आणि रूग्णवाहिका येण्यासाठी अडचण निर्माण झाली असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पनवेल ते कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग काजळी भोगावं पर्यंतच्या दौऱ्यात पत्रकारांनी लक्ष वेधले होते.
पश्चिमेकडील सर्विस रोड ची लांबी काटेतळी रस्त्यापासून उंबरकोंड रस्त्यापर्यंत अशी एकूण 1080 मीटर्स नवीन नियोजित आराखड्यात दाखविण्यात आली आहे. मात्र, हा सर्व्हिस रोड कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या कमानी नंतर काही मीटर अंतरावर चौपदरीकरणाच्या अंडरपास बॉक्स कटिंग महामार्गावर जोडला जाऊन संपुष्टात आला होता. यामुळे1080 मीटरची लांबी पश्चिमेकडील सर्विस रोडला मिळाली नसल्याने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयापर्यंत जाणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्ता दुभाजकावरून ग्रामीण रुग्णालयाकडे पायी अथवा वाहनाने येताना अपघात घडले असल्याने पश्चिमेकडील सर्विस रोडची लांबी आराखड्यानुसार उंबरकोडपर्यंत वाढवण्याची गरज स्पष्ट झाली होती. यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दौऱ्यात प्रस्तुत प्रतिनिधीने ही बाब निदर्शनास आणली होती.
यानंतर काही दिवसातच पश्चिमेकडील सर्विस रोड ची लांबी वाढवण्याचे काम सुरू झाले सध्या स्थितीत हे काम जय हनुमान नगर वसाहतीपर्यंत पोहोचले असून त्यापुढे काही अंतरावर दोन खाजगी गृहनिर्माण प्रकल्पांचे काम सुरू असल्याने तब्बल 250 मीटर्स अंतर आधीच हा सर्व्हिस रोड करण्यात आल्याने नियोजित उंबरकोंड फाट्यापर्यंत सर्विस रोड न पोहोचविण्यामागे कोणाचे हितसंबंध जोपासले जात आहेत, असा प्रश्न पोलादपूरवासियांकडून उपस्थित केला जात आहे. महामार्ग बांधकाम विभागाने सद्यस्थितीत सुरू असलेला पश्चिमेकडील सर्विस रोड नियोजित आराखड्यानुसार उंबरकोंड फाट्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.