मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे वाजले बारा ! कोकणातल्या लोकप्रतिनिधींमुळे जनतेचे हाल 

accident-goa
महाड ( मिलिंद माने ) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील कामाचे सन २०११ पासून ते २०२३ पर्यंत च्या बारा वर्षाच्या कारकिर्दीत कोकणातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कोकणातील जनतेचे बारा वाजवले गेले. यावर्षी देखील चाकरमान्यांसह रायगड वासियांचा प्रवास खड्ड्यातूनच होणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या कामाची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असली तरी प्राधिकरण या कामाबाबत उदासीन असल्याचे ७ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यातच मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीने पळस्पे फाटा ते महाड या १२० किलोमीटरच्या अंतरात लावलेल्या बॅनर मुळे पुन्हा एकदा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चर्चेत आला होता.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे फाटा ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील रखडलेल्या कामाबाबत तसेच कोकणात जाणारा महामार्ग ज्या ज्या ठिकाणी रखडला आहे. त्याबाबत झालेल्या सुनावणी मध्ये न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाब विचारल्यानंतर हा रस्ता चार आठवड्यात सुस्थितीत करण्याची हमी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा एकदा न्यायालयात दिली परंतु आता कितीही युद्धपातळीवर खड्डे भरण्याचे प्रयत्न केले तरी महामार्ग कधी सुस्थितीत येणार असा प्रश्न कोकणातील चाकरमानी कोकणातील लोकप्रतिनिधींना विचारीत आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील ८४ किलोमीटर लांबीचा रस्ता २१/०१/२०११ ला पनवेल इंदापूर हा सुप्रीम टोलवेज प्रॉडक्ट लिमिटेड या कंपनीला देण्यात आला. या कंपनीला १९/१२/२०११ रोजी या कामाचे नियुक्त पत्र देण्यात आले. त्यावेळी बांधकामाचा कालावधी १६/४/२०१४ पर्यंत होता. ९१० दिवसात या महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे प्रयोजन होते. आज २०२३ साल उजाडले तरी देखील बारा वर्षात या प्रकल्पाच्या ८४ किलोमीटरचे काम अद्यापि पूर्ण झालेले नाही. हूस्नबानू खलीपे, शरद रणपिसे, भाई जगताप, संजय दत्त या आमदारांनी विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नावर मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचे उत्तर दिले त्यानंतर सन २०१७ च्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधी सूचने द्वारे विचारलेल्या प्रश्नावर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे उत्तर दिले.
२८/०७/२०१६ च्या बैठकीत. हा रस्ता डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचे पुन्हा एकदा आश्वासन दिले. मात्र २०१६ च्या गणेशोत्सव काळात इंदापूर टोलवेज या कंपनीला पनवेल ते इंदापूर यादरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी तब्बल ५०० कोटी रुपये अदा करण्यात आले होते. त्यानंतर २०१८ च्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत नियम लक्षवेधी सूचना १०१ अन्वये आमदार अनिकेत तटकरे, आमदार सुनील तटकरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार रवींद्र फाटक यांनी विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नावर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे उत्तर दिले मात्र विधानसभा व विधान परिषदेत व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या पनवेल ते इंदापूर च्या रस्त्याबाबत अनेक वेळा बैठका घेऊन देखील अद्यापी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
या महामार्गाच्या रस्त्याच्या कामासाठी प्रथमतः जमीन संपादित करण्याऐवजी व संपादित जमिनीचा मोबदला जमीन मालकांना न देता रस्त्याचे काम सुरू झाल्याने अनेक ठिकाणी रस्ता रखडला. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गच्या रखडलेल्या कामाबाबत कोकणचे सुपुत्र ऍड. ओवेस पेचकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. या महामार्गाच्या ११ टप्प्यातील कामांपैकी दहा टप्प्यांची जबाबदारी ही राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची होती. त्यापैकी पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटर टप्प्यातील जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होती मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने वेळोवेळी केलेल्या दुर्लक्षामुळे या महामार्गावरून पावसाळ्यात प्रवास करणे म्हणजे कोकणवासीयांना डोकेदुखी होती मागील १२ वर्षात या टप्प्यातील राष्ट्रीय महामार्गाची दरवर्षी पावसाळ्यात दुरावस्था होत होती ही गंभीर बाब जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात ऍड. उमेश पेचकर यांनी या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार असल्याचे मागील वर्षी न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मुदत दिली होती.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग या महामार्गाच्या कामाबाबत गंभीर दिसत नसल्याचे निरीक्षण नोंदविले. मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला एकीकडे न्यायालयात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुरावस्थेबाबत खडसावले असताना दुसरीकडे पळस्पे फाटा ते महाड या महामार्गाच्या दोन्ही बाजूला मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने मध्यंतरी बॅनर बाजी करून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत पुन्हा एकदा जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा कोकणवासीयांच्या चर्चेत आला होता.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील काम मागील १२ वर्षापासून रखडले आहे. यासाठी शेतकऱ्यांसह व्यावसायिकांच्या जमिनी राज्य सरकारने भूसंपादित केल्या काहींची शेती, काहींची दुकाने, तर काहींच राहते घर,मात्र अनेकांना त्याचा मोबदला पुरेशा प्रमाणात वेळेत मिळाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी काम वारंवार ठप्प झाले हे वास्तव आहे. त्यातच महामार्गासाठी अनेक ठेकेदारांनी काम अर्धवट सोडून दिले मात्र त्याचा त्रास स्थानिक व या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना भोगाव लागला असून या महामार्गावरून प्रवास करताना अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे तर कित्येक जणांचा या महामार्गाच्या दुरावस्थामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.
या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे अनेकांचे बळी गेले आहेत या महामार्गाचे काम पूर्ण होण्याबाबत अनेक वेळा तारखा देण्यात आल्या मात्र त्याची अंमलबजावणी आज . बारा वर्षात पूर्ण झाली नाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २०२३ अखेर या महामार्गाचे काम पूर्ण होण्याचे संकेत दिले असले तरी या महामार्गावरील इंदापूर ते पळस्पे फाटा या ८४ किलोमीटर मधील रस्त्याच्या कामाचे पुन्हा डांबरीकरण ऐवजी काँक्रिटीकरण होणार आहे त्यातच महामार्गावरील प्रचंड अवजड वाहतूक तसेच कोकणात जाणाऱ्या एसटी बसेस व खाजगी वाहतूक यांची संख्या पाहता दहा मिनिटे जरी महामार्ग काही कारणामुळे ठप्प झाला तर महामार्गावर दोन्ही बाजूकडे तीन ते चार किलोमीटर पर्यंत रांगा लागतात ही आजची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम आता कधी पूर्ण होईल ते डिसेंबर २०२३ पर्यंत कसे पूर्ण होईल याबाबत रायगड वासियांच्या मनात मात्र शंका उत्पन्न होत आहे.
कोकणातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत रायगड जिल्ह्यातील आमदार खासदार अथवा या महामार्गावरून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणारे लोकप्रतिनिधी हे देखील ठोस आवाज उठवत नसल्याने या महामार्गाचे काम पूर्ण होण्यास आज 12 वर्षाहून अधिक कालावधी का लागला याचे उत्तर याच कोकणातील लोकप्रतिनिधींना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था सहित लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या जोगव्यासाठी दारोदार गेल्यावर या प्रश्नाला उत्तर द्यावे लागणार हे मात्र खरे आहे. त्यातच जन आक्रोश समितीने लावलेल्या बॅनर मुळे झोपी गेलेल्या ुढार्यां ना पुन्हा एकदा जागे करण्याचे काम या समितीने बॅनरच्या माध्यमातून केले मात्र तरीदेखील त्यानंतर पावसाळा चालू झाल्याने पुन्हा हा राष्ट्रीय महामार्ग दरवर्षीप्रमाणे खड्ड्यात गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading