मुंबईत टँकर असोसिएशनने केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीच्या विरोधात बुधवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला असून आज पाचव्या दिवशीही संप सुरुच आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, बांधकामे, कार्यालये, मॉल्स आणि इतर महत्त्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत.
टँकर चालकांनी केंद्राच्या नव्या धोरणाविरोधात नाराजी व्यक्त करत संप सुरु केला आहे. नव्या नियमावलीनुसार विहीर आणि कूपनलिका धारकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच प्रति टँकर 100 रुपये रॉयल्टी आणि मुंबई महानगरपालिकेला 5000 ते 15000 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर टँकर भरताना पार्किंगची अटही घालण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महापालिकेने विहीर व कूपनलिका धारकांना पाठवलेल्या नोटिशींना तात्पुरती स्थगिती दिली असली, तरी टँकर चालकांनी संप मागे घेतलेला नाही. त्यामुळे महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करत टँकर चालकांच्या शिष्टमंडळासह आयुक्त भूषण गगराणी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
सध्या मुंबईत 2500 ते 3000 टँकर अधिकृत असले तरी प्रत्यक्षात 40 ते 50 हजार टँकर कार्यरत असल्याचे सांगितले जाते. यामुळे पिण्याचे पाणी तसेच बांधकामांसाठी लागणाऱ्या पाण्याच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. टँकर चालकांचे म्हणणे आहे की, त्यांना परवानगी प्रक्रियेविषयी आक्षेप नाही, मात्र पार्किंगसाठीची सक्ती शिथिल करावी आणि मुंबईत सिंगल विंडो प्रणाली सुरु करावी, अशी त्यांची मागणी आहे.
या संपावर तोडगा काढण्यासाठी आज होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.