
माथेरान ( मुकुंद रांजाणे ) : सध्याच्या परिस्थितीत इंग्रजी बोलता येणे आवश्यक आहे. परंतु केवळ मुलांनी इंग्रजी बोलण्यासाठीच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणे गरजेचे नसते तर मराठी माध्यमाच्या शाळेत सुध्दा मुलं उत्तम प्रकारे इंग्रजी बोलू शकतात.आपला मुलगा चारचौघात फाडफाड इंग्रजी बोलला म्हणजे त्याने काही मोठा पराक्रम केला असे होत नाही तर त्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार सुध्दा होणे गरजेचे आहे.
माथेरान मधील बहुतांश मुलांनी सुरुवातीला नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतले आहे आणि त्यानंतर आठवी ते दहावी पर्यंत गव्हाणकर ट्रस्टच्या शाळेत शिकून पुढे महाविद्यालयात जाऊन आजच्या घडीला मोठमोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत. तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील ठराविक मुले वगळता अन्य कुणीही जीवनातील अभ्यासात्मक उद्दिष्टे गाठू शकलेले नाहीत की उच्च पदावर कार्यरत नाहीत.
आजही अनेक मुले इंग्रजी शाळेत शिकून एक प्रकारची गधामजुरीची कामेच करतांना दिसत आहेत. आजवरच्या कार्यकाळात अनेक पालकांनी कौटुंबिक भेदभावामुळे मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षण दिले आहे आणि मुलींना मराठी शाळेत शिकवित आहेत. कारण मुलगी लग्न झाल्यावर सासुरवाडीत जाणार आणि मुलगा घरचाच दिवा पालकांना वृद्धापकाळात आधार देणार अशी मानसिकता असल्याने मराठी शाळेतील पट संख्या लोप पावत चालली आहे.
अनेकदा काही पालकांना इंग्रजी शाळेची फी भरण्यासाठी सुध्दा पैसे नसतात परंतु मोठेपणामुळे कर्जबाजारी होऊन सुध्दा काही पालक मुलांना इंग्रजी शाळेत पाठवत आहेत.तर कधी तरी एखादया दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून शाळेची फी भरली जात आहे. इंग्रजी भाषा येणे ही सुद्धा काळाची गरज आहे त्यासाठी मराठी भाषेचा एकप्रकारे तिरस्कार करून मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षण देणे चुकीचे असल्याचे अभ्यासू पालक आपले मत व्यक्त करीत आहेत.
नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत मराठी माध्यम शाळा पटसंख्या
इयत्ता विद्यार्थी संख्या
पहिली २१
दुसरी २०
तिसरी २९
चौथी १६
पाचवी २६
सहावी. २०
सातवी ३८
आठवी. २८
नववी. २८
दहावी. २०
दोन्ही मराठी माध्यमाच्या शाळेत सर्व मिळून एकूण २४६ विद्यार्थी असल्यास या शाळा चालणार तरी कशा हा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे.