
माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
माथेरान हे नयनरम्य पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु सध्या इथे विखुलेल्या प्लास्टिकजन्य कचऱ्यामुळे या ठिकाणाची प्रतिमा धोक्यात आली आहे. “स्वच्छ माथेरान, हरित माथेरान” या संकल्पनांचा लोप होत असल्याची खंत स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. वाढती वस्ती आणि टपऱ्या उभारण्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून रस्त्यांच्या बाजूला व पॉईंट्सच्या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या, रॅपर्स आणि इतर कचरा साचत आहे.
नगरपरिषद दरवर्षी घनकचरा व्यवस्थापनावर करोडो रुपये खर्च करत असली तरी ठेकेदार आणि कामगार आत्मीयतेने काम करतात का, हा प्रश्न स्थानिकांना सतावतो आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे झाडे मरत असून, यामुळे इथले हवामान बदलले आहे. यामुळे बाराही महिने पंख्याची गरज भासते, हे स्थानिकांना त्रासदायक वाटत आहे.
पर्यावरणवाद्यांच्या दुर्लक्षामुळे, स्थानिक युवकांमध्ये असंतोष वाढला आहे. त्यांच्या मते, घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना द्यावा, ज्यांना गावाबद्दल तळमळ आहे. यामुळे नगरपरिषदेच्या खर्चात बचत होईल आणि गावातील पैसे गावातच राहतील.
वनखात्याची आणि वन संरक्षण समितीची जबाबदारीही महत्त्वाची आहे. जर रस्त्याच्या बाजूला तारेचे कंपाउंड करण्यात आले, तर वृक्षसंवर्धन होईल आणि माथेरानचे हरित रूप कायम राहू शकेल.