माथेरान नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी: राजकीय समिकरणांचा थरार आणि मतदारराजाची भूमिका

माथेरान नगर परिषदेकडून मच्छरदाणीचे वाटप
माथेरान  (मुकुंद रांजाणे) : 
माथेरान नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच काही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली असून केव्हा एकदा सभागृहात जाऊन आपल्या स्वप्नांची पूर्तता होतेय याकडे अनेक इच्छुकांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्याने सध्यातरी इथे तीन वर्षे प्रशासक राजवट अस्तित्वात आहे. सभागृहात सदस्य ( लोकप्रतिनिधी) नसल्याने कार्यालयीन कामकाजात ताळमेळ राहिलेला नाही.ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये या निवडणुका अपेक्षित आहेत.
एकूण सतरा सदस्य आणि दोन स्वीकृत सदस्यांची वर्णी काही महिन्यांतच लागणार आहे. त्यामुळे काही इच्छुक अगोदरच गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झाले आहेत. सद्यस्थितीत इथल्या राजकीय वातावरणाची भौगोलिक परिस्थिती पाहता ज्यांनी या गावाचे नेतृत्व करण्याचे दिवास्वप्न पाहिलेले आहेत अशा महाभागांना स्वप्नातच राहावे लागणार आहे की काय अशीही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरवेळेस इथले राजकीय समीकरण बदलत असून एकमेकांचे राजकीय विरोधक हे राजकीय गणिताचा मागमूस नसताना देखील गळ्यात गळा घालून केवळ सत्ता भोगण्यासाठी मनोमिलन करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
माथेरान सारख्या ठिकाणी कुणीही कितीही गावाच्या विकासासाठी सकारात्मक कामे पूर्ण केली असली तरी सुद्धा ठराविक सुज्ञ मतदार वगळता कुणालाही काहीही संबंध नसतो याचा प्रत्यय दरवेळी निवडणूक काळात उमेदवारांना येत आहे. त्यातच निवडणुका जवळ आल्यावर ज्या युवा वर्गाने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला साधी मते सुद्धा दिलेली नाहीत अशाच विरोधात कामे केलेल्या युवा वर्गाला आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नानाप्रकारची आमिषे देऊन खोटी आश्वासने माथी मारून संघटीत करण्याचा केविलवाणा प्रयत्न यानिमित्ताने पहावयास मिळतो आहे.
माथेरान मधील जे हाडाचे राजकारणी आहेत ते अजूनही गप्प बसून आहेत त्यांना ठाऊक आहे की कोणत्या वेळेस काय भूमिका पार पाडायची आहे. मतदारांना काय अपेक्षित असते आणि कोण मतदार कार्यकर्ता आपल्यापासून किती लांब धावणार आहे. याबाबत प्रत्येक व्यक्तीची नस नि नस येथील धूर्त गनिमी कावा करणाऱ्या राजकीय मंडळींना ज्ञात आहे. त्यामुळेच ते आजही बघ्याची भूमिका बजावताना दिसतात. कोणता उमेदवार आपल्या दबावात राहू शकतो आणि त्याची राजकीय कुवत काय आहे याचा सखोल अभ्यास, माहिती असल्याने सत्तेत सहभागी होण्यासाठी कुणाला किती महत्त्व द्यायचे, कुणाचा कसा वापर करून घ्यायचा, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आपला कार्यभाग साधायचा याची इत्यंभूत माहिती काही प्रमुख अभ्यासू राजकीय पक्षांची मंडळी यात पूर्णपणे पारंगत आहेत..त्यातच स्वकर्तुत्वाने खात्रीलायक सभागृहात निवडून जाणाऱ्या उमेदवाराला जो अभ्यासू आहे आणि आपल्याला नगरपरिषदेच्या सभागृहात मलिदा मिळवून देणारा नाही अशा निस्वार्थी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली यावेळेस पहावयास मिळणार आहे.
माथेरानच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले असते इथल्या घडामोडीवर बारकाईने लक्ष वेधलेले असते. दिल्लीतील राजकारणाला लाजवेल असे राजकारण केवळ याच ठिकाणी पहावयास मिळते त्यामुळेच माथेरानची निवडणूक एकप्रकारे सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. मिनी विधानसभा निवडणुक म्हणूनही इकडे सर्वांचे लक्ष केंद्रित असते. या आगामी निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक जे पाच वर्षे एकमेकांना पाण्यात पहात होते तेच महत्वाकांक्षी लोक राजकीय ज्ञान नसताना केवळ सत्ता उपभोगायची म्हणून हातात हात घालून मतदारांकडे मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदारी फिरताना दिसणार आहेत. काही विचारी मतदार सुध्दा ढोंगी उमेदवारांची लबाडी माहीत असल्याने यावेळी धूर्त उमेदवारांची वर्णी लागेलच याचीही शाश्वती देता येणार नाही.
कदाचित गावाचे नेतृत्व करू पाहणाऱ्या ईच्छुक उमेदवारांची संधी हुकून भलताच उमेदवार बाजी मारण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील काळात जरी कुणीही गळ्यात गळे घालून एकोप्याचे दर्शन दिले तरीसुद्धा जेष्ठ, जाणकार उमेदवार निश्चितच बाजी मारून सभागृहात आपला वरचष्मा दाखवण्याची चिन्हे सध्यातरी दिसून येत आहेत.त्यामुळे पुढील चार ते पाच महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणुकीत मतदार राजा हा जो उमेदवार गावाच्या विकासाला हातभार लावू शकतो, शासनाचा निधी उपलब्ध करुन हे पर्यटनस्थळ विकसनशील करू शकेल, आणि विशेष म्हणजे ज्याच्या अंगी स्वकर्तुत्व,अधिकारी वर्गासमोर गावाच्या हितावह समस्या मांडताना उत्तम वक्तृत्व आणि खऱ्या अर्थाने गावाचे नेतृत्व करू शकतो अशा उमेदवाराला सभागृहात जाण्यासाठी मतदार राजा स्वतःचा पुरेपूर आर्थिक कार्यभाग उरकून पाठबळ देऊ शकतो असे जुने जाणते राजकीय ज्ञान असणाऱ्या मंडळींमधून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading