माथेरान ( मुकुंद रांजाणे ) : माथेरान नगरपरिषदेच्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी वेळेवर हजर नसल्याने रुग्णांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत असून ह्या गलथान कारभारा बाबत स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेहमीच औषधांचा तूटवडा तर आहेच शिवाय शासन नियुक्त वैद्यकीय अधिकारी हेच हजर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. दि.६ रोजी सायंकाळी एक मुलगी भाजली असताना तिला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु त्याठिकाणी नियुक्ती करण्यात आलेल्या दोन्हीही वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती नसल्याने नाईलाजाने त्या मुलीला खाजगी क्लिनिकमध्ये उपचारार्थ दाखल केल्यामुळे त्या मुलीचे प्राण वाचले.
दवाखान्यात आलेल्या रुग्णांची हे वैद्यकीय अधिकारी उत्तम प्रकारे तपासणी सुध्दा करत नसल्याच्या अनेकदा तक्रारी होत आहेत. तर हे वैद्यकीय अधिकारी केव्हाही सुट्ट्या घेत असतात मनाला वाटेल त्याप्रमाणे वागत असतात. रुग्णांशी उद्धट वर्तन करत असल्याचे नागरिक बोलत आहेत. त्यातच या नगरपरिषदेत मुख्याधिकारी कार्यरत नसल्याने नगरपरिषदेच्या कर्मचारी वर्गाची मनमानी चालू असल्याचे चित्र दिसत आहे. कुणीही कधीही कामावर येत असून नागरिकांची कामे प्रलंबित रहात आहेत.
दवाखान्यात ज्यांची नियुक्ती प्रमाणे कामे आहेत ती कामे आपापल्या हुद्द्याप्रमाणे केली जात नाहीत. याकामी जिल्हाधिकारी रायगड यांनी कार्यानुरूप मुख्याधिका-यांची नियुक्ती केल्यासच सर्व कर्मचारी वर्गावर अंकुश राहू शकतो अन्यथा ह्या गलथान कारभारामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.