
माथेरान (मुकुंद रांजणे) :
रायगड पोलीस आयोजित रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत सुरक्षित शाळा व स्टुडन्ट ऑफ रोड सेफ्टी सन्मान सोहळा 2025 “बालगंधर्व रंगभवन”रिलायन्स टाउनशिप नागोठणे ता. रोहा जि. रायगड येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातून एकूण 28 शाळांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचे वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर, माथेरान या शाळेचाही गौरव करण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा 2024-25 या उपक्रमात शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला होता. यानिमित्ताने अजून एक मानाचा तुरा *सुरक्षित शाळा* म्हणून नगरपरिषद आणि शाळेच्या शिरपेचात रोवला गेला आहे. सुरक्षित शाळेच्या नियमावलीत सीसीटीव्ही कॅमेरे, मुलामुलींसाठी स्वतंत्र टॉयलेट, मुलींच्या समस्यांसाठी स्वतंत्र महिला कर्मचारी नेमणूक इत्यादी मुद्द्याचा विचार केला गेला.
या भव्यदिव्य सन्मान सोहळ्यासाठी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचे उत्तम प्रशासक तथा कार्यशील मुख्याधिकारी राहुल इंगळे ,कार्यालय अधीक्षक सदानंद इंगळे , शाळेचे मुख्याध्यापक दिलीप आहिरे, संतोष चाटसे हे शिक्षक उपस्थित होते. मंत्री आदिती तटकरे व पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.